भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्या असल्याने ‘सेक्रेड गेम्स’ ही वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अशात या सीरिजमध्ये काम करणाऱ्या राजश्री देशपांडेने तिला आलेला भयानक अनुभवही कथन केला आहे. नेटफ्लिक्सवरच्या सेक्रेड गेम्स या सीरिजमध्ये मी टॉपलेस सीन दिला, त्यानंतर काही प्रणय दृश्ये साकारली ज्यानंतर मला पॉर्न स्टार असल्याचे मेसेज येऊ लागले. यामुळे मी दुखावले आहे असे राजश्री देशपांडेने म्हटले आहे. स्पॉट बॉय इला दिलेल्या मुलाखतीत राजश्रीने आपली व्यथा बोलून दाखवली आहे.

सेक्रेड गेम्ससाठी टॉपलेस होणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. मात्र तरीही मी तो सीन पूर्ण केला. मात्र मी हे दृश्य साकारत असतानाचे काही फोटो व्हॉट्स अॅप आणि सोशल मीडियावर लीक झाले आणि मला मी पॉर्न स्टार आहे हे सांगणारे मेसेज येऊ लागले. या मेसेजमुळे मी प्रचंड अस्वस्थ झाले आहे असेही राजश्रीने म्हटले आहे. ‘हॉट इंडियन अॅक्ट्रेस विथ मंगलसूत्रा’ असे टॅग लावून माझे फोटो व्हायरल करण्यात आले आहेत. मला येणाऱ्या मेसेजेसकडे सुरूवातीला मी दुर्लक्ष केले. मात्र काही लोकांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शेरेबाजी केली आहे. एखाद्या सिनेमा, सीरिजमध्ये टॉपलेस झाल्याने पॉर्नस्टारचा शिक्का का बसला? असा अस्वस्थ प्रश्न राजश्रीने विचारला आहे.

सेक्रेड गेम्सचा दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. जे दृश्य मला साकारायचे होते त्याची पूर्वकल्पना त्याने मला दिली होती. एवढेच नाही तर तुला वाटत नसेल तर आपण हा सीन नाही करायचा असेही अनुरागने मला सांगितले होते. मात्र सिनेमा हे माझे पॅशन आहे त्यासाठी मी काहीही करू शकते हा विचार मी केला आणि टॉपलेस सीन दिला यात मी काय चूक केली? असेही राजश्रीने विचारले आहे. माझ्या नवऱ्याने मला या सगळ्यात मला साथ दिली असून तो माझ्या पाठिशी ठामपणे उभा आहे. तू जीव ओतून काम केले आहेस, तुला स्वतःला ठाऊक आहे की तू काय आहेस मलाही ठाऊक आहे, अशात तू इतर कोणत्याही टीकेचा विचार करण्याची गरज नाही असे त्याने मला सांगितल्याचेही राजश्रीने स्पष्ट केले.