राम चरण आता केवळ तेलुगू चित्रपटसृष्टीतच नाही, तर बॉलीवूडमध्येही एक मोठे नाव आहे. जगभरात त्याचे लाखो चाहते आहेत, जे त्याची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. लोकांना त्याचा अभिनय आवडतोच; पण ते त्याच्यावर खूप प्रेमदेखील करतात.
राम चरणबरोबरच त्याची पत्नी उपासना कोनिडेलादेखील अनेकदा चर्चेत असते. ती एक व्यावसायिक महिला आहे. दोघेही त्यांचे वैयक्तिक आयुष्य प्रसिद्धीपासून दूर ठेवतात.
आता अलीकडेच, कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, उपासनाने तिच्या हैदराबादच्या घराचा व्हिडीओ दाखवला, जे एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही. त्या घराचा प्रत्येक कोपरा एक कहाणी सांगतो. तिचे घर पाहून चाहते आता आश्चर्यचकित झाले आहेत. ते म्हणतात की ते एखाद्या रिसॉर्टपेक्षा कमी नाही. चला तुम्हाला राम चरण आणि उपासनाच्या घराची एक झलक दाखवतो.
राम चरण आणि उपासना हे तेलंगणातील हैदराबाद येथील ‘कोनिडेला हाऊस’ मध्ये राहतात. त्यांची मुलगी क्लिन कारा, मेगास्टार सासरे चिरंजीवी आणि कुटुंबातील इतर सदस्यही त्यांच्याबरोबर राहतात. या स्टारचे घर हैदराबादसारख्या गजबजलेल्या शहराच्या मध्यभागी बांधलेले आहे. त्यांचे घर आतून इतके शांत आहे की, तिथे जाणारा प्रत्येक जण बाहेरील सर्व काही विसरून जाईल. घराच्या आत एक बाग आहे, ज्यातून मुख्य घरात प्रवेश करता येतो.

या जोडप्याचे हे घर हलक्या पांढऱ्या रंगाने रंगवलेले आहे. घाराला मोठ्या काचा असलेल्या खिडक्या आहेत. घराचे अंगण आरामदायी फर्निचरने सजवलेले आहे, जिथे बसून घराबाहेरील सौंदर्याचा आनंद घेता येतो. ज्याप्रमाणे रिसॉर्टस् त्यांच्या भव्य डिझाइनसाठी ओळखली जातात, त्याचप्रमाणे राम आणि उपासना यांचे घरही आहे. कॉमन एरियामध्ये उघड्या खिडक्या आणि फ्रेंच आउटडोर स्पेस आहे, ज्यामुळे तेथे एखाद्या रिसॉर्टससारखी अनुभूती मिळते.

या जोडप्याच्या घराचा प्रत्येक कोपरा त्याच्या सजावटीद्वारे स्वत:ची एक कथा सांगतो. जगभरातील प्रवासातून आणलेल्या प्राचीन लाकडी कलाकृती, पारंपरिक शोपीस व प्राचीन संग्रह यांतून त्यांच्या घराच्या प्रत्येक भागाला एक वेगळा लूक मिळतो.

घराचा डायनिंग एरियाही तितकाच भव्य आहे, जिथे एका आलिशान झुंबराखाली एक मोठे टेबल आहे. त्याशिवाय टेबलावर पाहुण्यांसाठी प्रिंटेड मेनू आहेत, जे अतिशय सुंदररीत्या डिझाइन केले गेले आहेत. जेवणाच्या डायनिंग टेबलच्या मध्यभागी फुलांचा हार आणि एक सुंदर कँडेलब्रा आहे, जी पांढऱ्या आणि बेज रंगामुळे खूप छान दिसते.