Mandakini On Male-Dominating Industry : बॉलीवूडमध्ये सगळेच आपलं नशीब अजमावण्यासाठी येत असतात. त्यातले काही जण यशस्वी होतात तर काही जणांचा स्ट्रगल सुरूच राहतो. परंतु, त्यापैकी फार कमी लोकांनाच उज्ज्वल करिअर घडवता येते. त्यांच्यात मंदाकिनी यांचे नावही आहे.
‘राम तेरी गंगा मैली’ जेव्हा जेव्हा या चित्रपटाचे नाव ऐकले जाते तेव्हा दिग्गज अभिनेत्री मंदाकिनी यांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो. मंदाकिनी यांनी १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या राज कपूर यांच्या ‘राम तेरी गंगा मैली’ या शानदार चित्रपटातून त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.
या चित्रपटात मंदाकिनी यांनी एक बोल्ड सीन दिला, विशेषतः झऱ्याखालील सीन. त्या सीनमध्ये त्या फक्त पांढऱ्या साडीत झऱ्याखाली उभ्या राहिल्या होत्या. राजीव कपूर यांच्याबरोबरची त्यांची जोडी आणि त्यांच्या सुंदर शैलीने त्यांना एका रात्रीत स्टार बनवले. पण, या स्टारडममागे असे काहीतरी होते, ज्याचा सामना मंदाकिनीसारख्या मोठ्या स्टार अभिनेत्रीलाही करावा लागला.
९० च्या दशकात पुरुष नायकांचे चित्रपटांवर वर्चस्व होते
९० च्या दशकात चित्रपटांमध्ये अभिनेत्यांचा दबदबा होता. अभिनेत्रींपेक्षा अभिनेत्यांच्या नावावर चित्रपट चालायचे. त्याच काळात मंदाकिनी यांना काही कटू अनुभव आले. सुमारे दोन वर्षांपूर्वी एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत मंदाकिनी यांनी सांगितले होते की, १९८० आणि ९० च्या दशकात पुरुष कलाकार चित्रपटसृष्टीवर वर्चस्व गाजवत असत. त्यांनी सांगितले की, चित्रपटाचा नायक अनेकदा ठरवत असे की, त्याच्याबरोबर कोणत्या अभिनेत्रीला कास्ट करायचे आणि कोणत्या नाही. त्या पुढे सांगतात की, जर एखाद्या नायकाला एखादी अभिनेत्री आवडत नसेल किंवा तिच्याशी भांडण झाले असेल, तर निर्माता आणि दिग्दर्शक त्याच्या म्हणण्याशी सहजपणे सहमत होत आणि दुसऱ्या अभिनेत्रीला घेत.
त्या मुलाखतीदरम्यान जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, त्यावेळी तुम्ही ही परिस्थिती कशी हाताळली? तेव्हा मंदाकिनी अशी परिस्थिती झाल्याशी सहमत होत म्हणाल्या, “हो, माझ्याबरोबर दोनदा असे घडले. जेव्हा एका मोठ्या अभिनेत्याला माझ्याबरोबर काम करायला आवडत नव्हते आणि त्यामुळे मला त्यातून काढून टाकण्यात आले होते.
मंदाकिनी यांना त्यांच्या यशादरम्यानही, इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. एक अनुभव सांगताना त्या म्हणाल्या होत्या की, एका निर्मात्याने त्यांना पटकथा सांगितली आणि ती ऐकल्यानंतर त्यांनी होकार दिला. पण काही दिवसांनी असे जाहीर झाले की, त्या चित्रपटात दुसऱ्याच अभिनेत्रीला कास्ट करण्यात आले आहे. त्यामागील कारण विचारले असता, मंदाकिनी त्या चित्रपटासाठी एक लाख रुपये घेणार होती; तर दुसरी अभिनेत्री ७५ हजार रुपयांत काम करण्यास तयार झाली होती.
राज कपूर दिग्दर्शित ‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला. या चित्रपटाने मंदाकिनी यांच्या कारकिर्दीला एक नवीन उंची दिली. ‘मेरा साथी’ चित्रपटापासून सुरू झालेली मंदाकिनी यांची कारकीर्द १९९६ मध्ये ‘जोरदार’ चित्रपटाने संपली. चित्रपटसृष्टीमधून दूर जाण्यापूर्वी मंदाकिनी यांचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशीही जोडले गेले होते.