टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘रामायण’ बनवणाऱ्या रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्रा सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आहे. ती तिच्या अतरंगी आउटफिट आणि बोल्ड अवतारामुळे चर्चेत असते. पण आता ती वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. साक्षीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत नेटफ्लिक्सचा रिअॅलिटी शो ‘सोशल करेन्सी’च्या निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.
सई ताम्हणकरचे बॉयफ्रेंडबरोबर स्पेन व्हेकेशन, अनिश जोगने शेअर केला रोमँटिक फोटो
साक्षीने इन्स्टाग्रामवर बोल्ड फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये गंभीर आरोप केले आहेत व झालेल्या प्रकाराची माहिती दिली आहे. “लैंगिक छळ, दिवसाला एका कॉलचे वचन देण्यात आल्याने मी कॉन्ट्रॅक्ट साइन केला होता. पण नेटफ्लिक्सने एक वर्षाहून अधिक काळ माझा पाठलाग केला, अगदी मला खात्री पटावी, यासाठी एका रिस्पेक्ट टीमची मीटिंगही आयोजित करण्यात आली. मी सुरुवातीला नकार दिला, पण मला खूप कॉल व मेसेज आले. हा फक्त एक गेम शो आहे ज्यात गाणे, कंटेंट मेकिंग अशी मनोरंजनात्मक कार्ये आहेत यावर माझा विश्वास बसवण्यात आला. त्यांनी आम्हाला जेवणही दिले नाही,” असा आरोप साक्षीने केला आहे.
पुढे ती म्हणाली, “एखाद्याला कॉन्ट्रॅक्टवर सही करायला लावून घरात कोंडून कोण ठेवतं? मी माझ्या ड्रेसिंगच्या निवडीबद्दल बोल्ड आहे, पण त्यांनी असं गृहीत धरले मला या घाणीची कोणतीच अडचण नसेल. मी माझे संगीत, कुटुंब आणि शांतीचा आनंद घेते. मला माझ्या आयुष्यात एवढंच हवं आहे. मला घरून दिवसाला एक फोन येणार नसेल तर मी कॉन्ट्रॅक्टवर सही करणार नाही, असं मी स्पष्ट सांगितलं होतं, कारण मी आईशिवाय जगू शकत नाही. तेव्हा त्यांनी या सर्व गोष्टींचे वचन दिले आणि मी होकार कळवल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केले. एका स्पर्धक मृदुल माझ्या स्तनांबद्दल आणि माझ्या नितंबाबद्दल उघडपणे बोलला. त्यांनी ते रेकॉर्ड केलं आणि सर्वांना ऐकवलं, मलाही ऐकवलं. फक्त तुमच्या रेटिंगच्या फायद्यासाठी तुम्ही मला त्यावर प्रतिक्रिया मागितली, हा खरंच एक गेम शो आहे का?” असा प्रश्नही साक्षीने विचारला.
निर्मात्यांनी तिला आईशी बोलूही दिले नाही, असा आरोपही साक्षीने केला आहे. तिच्या प्रत्येक कॉल आणि मेसेजवरही ते लक्ष ठेवून होते. साक्षी म्हणाली की जेव्हा तिने आईला सर्व काम आणि लैंगिक अत्याचाराबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा निर्मात्यांनी तिचा फोन हिसकावून घेतला आणि कॉल करू दिला नाही. निर्मात्यांना शोधमून बाहेर काढण्याची विनंतीही तिने केली होती, असंही तिने सांगितलं. अशा प्रकारच्या शोमध्ये सहभागी होण्याची ही शेवटची वेळ आहे, असंही साक्षी म्हणाली.