रणबीर कपूरबरोबर ‘अॅनिमल’ चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री इंदिरा कृष्णन आता रणबीरच्या ‘रामायण’ चित्रपटात दिसणार आहेत. रणबीरच्या सहकलाकार इंदिरा कृष्णन यांनी आता अभिनेत्याचे कौतुक केले आहे.
रामायणातील भगवान रामाच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतल्याचे त्यांनी सांगितले. रणबीरचे डोळेही वेगवेगळ्या भाषा बोलतात, असेदेखील त्यांनी सांगितले.
या सिनेमासाठी रणबीर चांगलीच तयारी करीत आहे. सुरुवातीला रणबीर त्याच्या भाषेवर काम करत आहे. केवळ शारीरिक बदल नाही, तर त्याने वागण्या-बोलण्यातही बदल केला आहे.
रामाची भूमिका साकारण्यासाठी रणबीरने खूप मेहनत घेतली
‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या एका मुलाखतीत इंदिरा कृष्णन म्हणाल्या, “रणबीरने केवळ त्याच्या शारीरिकतेवरच काम केलेले नाही, तर त्याचे डोळेही वेगवेगळ्या भाषा बोलतात. आम्ही चंदन विधीचं शूटिंग करीत होतो. त्यावेळी ज्या पद्धतीने रणबीर बसला होता तेव्हा आम्ही सर्वांनी अशी कल्पना केली की, स्वतः भगवान श्रीरामही असेच बसले असतील. रणबीरने शरीराचा वरील भाग, चेहरा, डोळे या गोष्टींना ज्या पद्धतीने सर्वांसमोर ठेवलं, ते खूप कठीण काम आहे. तो तीन ते चार तास कसरत करायचा आणि नेहमी सेटवर वेळेवर यायचा. पॅकअप केल्यानंतर तो पुन्हा कसरत करायला जायचा.”
पुढे त्या म्हणाल्या, “मला शूटिंगचा पहिला दिवस लक्षात आहे. फक्त धोतर नेसून या सीनचं रणबीर शूटिंग करत होता. परंतु तरीही ज्या प्रकारची सहजता रणबीरनं अभिनयात दर्शवली त्याला तोड नाही. ‘रामायण’ सिनेमाचा हाच प्लस पॉईंट आहे. ‘अॅनिमल’मधला रणबीर आणि ‘रामायण’मधला रणबीर यांत खूप फरक आहे.” असं इंदिरा कृष्णन म्हणाल्या. इंदिरा या चित्रपटात श्रीरामांची आई कौशल्यामातेची भूमिका साकारणार आहेत.
रणबीर कपूरच्या ‘रामायण’बद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होऊ शकतो. रणबीर कपूरव्यतिरिक्त यश, साई पल्लवी, सनी देओल, अरुण गोविल व रवी दुबे हे कलाकार या चित्रपटात दिसतील. तब्बल चार हजार कोटींच्या बजेटमध्ये ‘रामायण’ सिनेमा बनत आहे.