२३-२४ नोव्हेंबरला प्रसारण झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमात येत्या सोमवार आणि मंगळवारी (२३ व २४ नोव्हेंबर रोजी) राजकीय वादळ घोंगावणार आहे. हे राजकीय वादळ कोणाकोणाची आणि कशी दाणादाण उडविणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
‘चला हवा येऊ द्या’च्या घरात आत्तापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी येऊन गेली. मात्र या घरात आत्तापर्यंत राजकीय नेते आलेले नव्हते. ती उणीव येत्या सोमवार आणि मंगळवारी होणाऱ्या कार्यक्रमात भरून काढण्यात आली आहे. या दोन्ही दिवशी होणाऱ्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री नारायण राणे, ‘भारिप’चे नेते रामदास आठवले, ‘मनसे’चे नेते नितीन सरदेसाई हे राजकीय पटलावरचे तीन मोहरे सहभागी होणार आहेत.
राणे यांनी मुख्यमंत्री असताना केलेली कामे आणि घेतलेले निर्णय याच्या आठवणी जाग्या करणारे एक पत्र (अर्थात काल्पनिक) या भागात वाचायला मिळणार आहे. हे पत्र महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या ‘वर्षां’ या बंगल्याने लिहिलेले
आहे. कार्यक्रमात राणे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेतच्या काही आठवणींनाही उजाळा दिला आहे.
चारोळ्या आणि कवितांसाठी प्रसिद्ध असलेल्या रामदास आठवले यांनी काही राजकीय वक्तव्यांबरोबरच ‘शोले’ चित्रपटातील ‘गब्बरसिंग’च्या भूमिकेचे प्रहसन तसेच काही कविताही सादर केल्या आहेत. तर सरदेसाई यांनी ‘पळते भय्ये पाहू या मामाच्या गावाला जाऊ या’ हे गाणे सादर केले आहे. २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता हे दोन्ही भाग प्रसारित होणार आहेत.