प्रत्यक्ष राघोबादादा पेशवे यांना शिक्षा सुनावत न्यायदानामध्ये नि:स्पृह बाण्याची साक्ष देणारे रामशास्त्री प्रभुणे यांच्या कर्तृत्वावर बेतलेल्या प्रभात फिल्म कंपनीच्या ‘रामशास्त्री’ चित्रपट प्रदर्शनाची रविवारी (३० जून) अमृतमहोत्सवपूर्ती होत आहे. ३० जून १९४४ रोजी मुंबईच्या सेंट्रल चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने एक इतिहास घडविला आणि रामशास्त्री म्हणजे गजानन जहागीरदार हे समीकरण रूढ झाले. महाराष्ट्रातील काही न्यायालयांमध्ये तसेच वकिलांच्या कार्यालयांमध्ये रामशास्त्री म्हणजेच जहागीरदार यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत.

‘रामशास्त्री’ चित्रपटाची जुळवाजुळव सुरू असताना १९४२ च्या सुमारास व्ही. शांताराम यांनी प्रभात फिल्म कंपनी सोडली. त्यामुळे विष्णुपंत दामले आणि साहेबमामा फत्तेलाल यांच्याकडे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आली. शिवरामपंत वाशीकर यांनी कथा-पटकथा लेखन केले. प्रत्यक्ष चित्रीकरणास सुरुवात झाली, मात्र दामले यांच्या प्रकृती-अस्वास्थ्यामुळे सारी जबाबदारी फत्तेलाल यांनी पार पाडली. गजानन जहागीरदार यांनी रामशास्त्री प्रभुणे यांची प्रमुख भूमिका तर केलीच, पण त्यांच्याकडे दिग्दर्शनाची जबाबदारी टाकण्यात आली होती त्या संधीचे त्यांनी सोने केले. अखेर ३० जून १९४४ रोजी हा चित्रपट प्लाझामध्ये झळकला. त्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत, अशी माहिती दामले यांचे नातू अनिल दामले यांनी दिली.

प्रभातकारांना दूरदृष्टी असल्याने सामान्य लोकांकडून त्यांनी उत्तम काम करून घेतले, असे सांगून दामले म्हणाले, प्रभातमधील कर्मचारी गणपतराव तांबट यांच्याकडे पाहून ‘अरे, याला मेकअप करा,’ असे दामलेमामा यांनी फत्तेलाल यांना सांगितले. फत्तेलाल यांनी तांबट यांच्या गालावर एक मोठय़ा जखमेचा व्रण कोरला आणि ते राघोबादादा ठरले. प्रभातच्या रसायनशाळेतील बापूसाहेब बेंद्रे यांनी नारायणरावांची भूमिका साकारली. बालपणातील रामची भूमिका अनंत मराठे यांनी केली होती. ‘दोन घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव’ हे बेबी शकुंतला यांच्याबरोबर चित्रित झालेल्या या गाण्याचा गोडवा अजूनही रसिकांच्या मनाला आनंद देणारा आहे. चित्रपटातील अखेरचा दरबारातील प्रसंग मनाचा ठाव घेणारा झाला आहे. भर दरबारात राघोबादादांचा राज्यारोहण सोहळा सुरू असताना ‘उचल ती तलवार, म्हणजे तिच्यावर असलेले नारायणरावांच्या रक्ताचे डाग तरी या सर्व मानकऱ्यांना दिसतील,’ हे वाक्य स्वत:च्या जिवाची पर्वा न करता रामशास्त्री उच्चारतात तेव्हा साऱ्यांच्या मनावर रामशास्त्र्यांचे कर्तृत्व ठसते.

चित्रपटामध्ये वास्तविकता यावी यासाठी भारत इतिहास संशोधक मंडळाने मदत केली. राजा केळकर यांनी त्यांच्या संग्रहातील दुर्मीळ वस्तू चित्रीकरणासाठी देऊ केल्या. तर, सरदार घराण्यातील वंशजांनीही त्यांच्याकडील वस्तू आणि कपडे वापरण्यासाठी दिले. ३० जून १९४४ रोजी ऐन पावसाळ्यात मुंबईच्या सेंट्रल चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेला ‘रामशास्त्री’ २७ आठवडे चालला. तर, पुण्यातील प्रभात चित्रपटगृहामध्ये ३० आठवडे चालला. या चित्रपटाने प्रभात फिल्म कंपनीला कीर्ती आणि आर्थिक उत्पन्न मिळवून दिले. हिंदूी आवृत्तीमुळे रामशास्त्री चित्रपट देशभर प्रदर्शित झाला. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखविला जातो. जहागीरदार यांनी साकारलेला न्यायाधीश असा पुन्हा होणे नाही, असे दामले यांनी सांगितले.

‘रामशास्त्री’ची मोहिनी

  • ‘रामशास्त्री’ चित्रपट सत्य, समानता आणि न्याय यावर आधारित असून महत्त्वाचा संदेश देणारा हा चित्रपट सरकारने देशभर दाखवावा, असे सिंधमधील पत्रकारांनी म्हटले असल्याचे ‘द स्टार’ या सिनेनियतकालिकामध्ये नमूद करण्यात आले होते.
  • ‘संडे लीडर’ने २६ नोव्हेंबर १९४८च्या अंकात ‘भारतात जीवनचरित्रपट फारसे होत नसतानाच्या काळात प्रभातने ऐतिहासिक सत्य प्रतीत करणारा चित्रपट निर्माण केला आहे,’ असे म्हटले आहे.