Ranya Rao Case : कन्नड अभिनेत्री रान्या रावला ४ मार्च रोजी बंगळुरू विमानतळावरून अटक करण्यात आली होती. रान्या राव ही बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती, तेव्हा तिच्याकडे मोठ्या प्रमाणात सोनं आढळून आलं होतं. दुबईहून परतत असताना महसूल गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांनी तिची झडती घेतली असता तिच्याकडे तब्बल १४.८ किलो सोनं आढळून आलं होतं.

या सोन्याची किंमत जवळपास १२ कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली होती. या कारवाईनंतर तिला अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून ती तुरुंगात आहे. दरम्यान, आता सोन्याच्या तस्करी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेत्री रान्या रावला महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) तब्बल १०२ कोटींचा दंड ठोठावला असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

दरम्यान, सोन्याच्या तस्करी प्रकरणात फक्त अभिनेत्री रान्या राव ही नाही तर आणखी तीन आरोपी असून त्यांच्यावरही कारवाई करण्यात आलेली आहे. या प्रकरणाबाबत अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “जप्त केलेल्या सोन्याचे बाजार मूल्य आणि तपासकर्त्यांच्या समोर आलेली तपासातील माहिती व सीमाशुल्क एकत्रित करून दंडाची गणना करण्यात आली आहे. मात्र, या आर्थिक दंड फक्त एक दंड असून या प्रकरणातील खटला कायद्यानुसार सुरू राहील”, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

१५ दिवसांत चार वेळा दुबईला गेल्याने डीआरआयच्या रडारवर

डीआरआय (रेव्हेन्यू इंटेलिजेंस डायरेक्टरेट) रान्या रावच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. त्यामुळे अभिनेत्री बायपास करण्याचा प्रयत्न करत असताना, डीआरआयने तिला रंगेहाथ पकडलं होतं. यानंतर अधिकाऱ्यांनी रान्या रावच्या जॅकेटमधून १२.५६ कोटी रुपयांचं १४.२ किलो सोने जप्त केलं होतं. १५ दिवसांत ती चार वेळा दुबईला गेली आणि त्यामुळे ती डीआरआयच्या रडारवर होती. रान्या रावला अटक केल्यानंतर पोलिसांनी तिच्या घरावरही छापा टाकला होता. यात पोलिसांनी २.६७ कोटी रुपयांची रोकड आणि २.०६ कोटी रुपयांचे सोने जप्त केले होते. तसंच पोलिसांनी रान्या रावच्या घरातून तीन मोठे बॉक्सदेखील जप्त केले. या जप्तीची एकूण किंमत १७.२९ कोटी रुपये आहे.

कोण आहे अभिनेत्री रान्या राव?

दरम्यान, रान्या रावने (Ranya Rao) कन्नड आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. ती कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे डीजीपी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. रान्या राव कोठडी आहे. तसंच तिची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, आता सोन्याच्या तस्करी प्रकरणात मोठी अपडेट समो आली असून रान्या रावला १०२ कोटींचा दंड ठोठावल्याच्या प्रकरणी तिच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.