गूढ आणि थराराने परिपूर्ण अशी मालिका म्हणून ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेला ओळखले जाते. सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. मात्र यात ‘शेवंता’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. त्यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांसह चाहत्यांना धक्का बसला आहे.

अपूर्वाने हा निर्णय नेमका का घेतला? याचे स्पष्टीकरण तिने दिले आहे. इन्स्टाग्रामवर सलग तीन पोस्ट करत तिने ही मालिका सोडत असल्याचे जाहीर केले आहे. मी शेवंताच्या भूमिकेचा त्याग का केला? या प्रश्नाचं उत्तर देणे ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे. या गोष्टीचा उलगडा करणे हे माझे कर्तव्य समजून याचा खुलासा करीत आहे, असे अपूर्वाने यावेळी म्हटलं.

‘शेवंता’
बस नाम ही काफी है, पर कभी कभी ये इतनाही काफी नही होता


‘”शेवंता’ म्हणून आपली एक ओळख आणि नंतर ते जिव्हाळ्याचे नाते या एका साध्या अपूर्वाशी जोडले गेले. एक अभिनेत्री म्हणून मला ही भूमिका करताना खूप मजा आली आणि समाधानही वाटले. खरं सांगायचं तर ‘शेवंता’चे सादरीकरण हे मला सहज जमत गेले. जणू काही मीच ती ‘शेवंता’ अशी एक चेतना, आजवर मी जगत आले. त्या भूमिकेमधले नाविन्य, त्या व्यक्ती रेखेतील विविध पैल, निर-निराळ्या छटा यामुळे प्रेक्षकांमध्ये ‘शेवंता’ ही अजरामर झाली. ‘शेवंता’ची भूमिका मला खूप काही देऊन गेली.”

“असे सर्व काही छान घडत असताना आपल्या सर्वांच्या मनात एकच उत्सुकता असेल की मी ‘शेवंता’च्या भूमिकेचा त्याग का केला? असे काय घडले ज्याने मला हा प्रतिकूल निर्णय घ्यावा लागला? मला माझ्या सोशल मीडियावर कमेंटमार्फत, ईमेल्समधून प्रेक्षकांनी याबद्दल विचारणा केली. त्याच उत्तर देणे ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे. या गोष्टीचा उलगडा करणे हे माझे कर्तव्य समजून याचा खुलासा करीत आहे.”

‘”शेवंता’ या भूमिकेसाठी मी १० किलो वजन वाढवलं होतं. वजन वाढल्यावर ज्या काही नेगिटिव्ह कमेंट्स आल्या त्याला मी फेस करत आले. परंतु आता सेटवर काम करत असताना अगदी नवख्या आणि काही ज्येष्ठ कलाकारांनी विनाकारण या वाढलेल्या वजनावर माझे विडंबण केले. उघडपणे माझी खिल्ली उडवली गेली. त्यात काही कमेंट्स तर मला जिव्हारी लागतील अशा जाणीवपूर्वक वारंवार केल्या गेल्या. त्याबद्दल वरिष्ठांनी त्यावर कारवाई केल्यानंतरही संबंधित नवख्या कलाकारांनी साधी दिलगिरीसुद्धा व्यक्त केली नाही.”

“तुम्हाला माहितीच आहे की ‘रात्रीस खेळ चालेचं शूटींग हे सावंतवाडीत चालू आहे. मी मुंबईवरुन १२ तासाचा ट्रेनने प्रवास करुन जात होते. मला शूटींग करता बोलवल्यानंतर फक्त एकच दिवस शूट करुन नंतर ३-४ दिवस काहीच शूट केलं जात नव्हतं. असं महिन्याभरात केवळ ६ ते ७ दिवसच काम लागत होतं आणि त्याकरिता मला वारंवार प्रवास करावा लागत होता. त्यात माझा अमूल्य वेळ संपूर्ण महिनाभर वाया जात होता.”

“प्रोडक्शन हाऊसकडून मला सांगण्यात आलं होतं की तिसऱ्या सिझनसाठी आम्हाला तुमचे ५ ते ६ दिवसच लागणार आहे. म्हणून तेव्हा मी नकार दिल्यानंतर चॅनेलकडून मला आणखी एक शो देण्याचे आश्वासन दिले गेले. परंतु ५ ते ६ महिने झाले अद्याप ते आश्वासन पाळलं गेले नाही. त्यामुळे माझे आर्थिक नुकसान होत आहे.”

“असाच प्रकार गेल्यावर्षी ‘झी युवा’वरील ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेच्या वेळी घडला. त्या मालिकेचा शेवटचा चेक मिळाला नाही म्हणून त्याबाबत सुद्धा चॅनेलकडून एकही पैसा बुडणार नाही,असं आश्वासन दिले गेले होतं. अद्याप पर्यंत तो चेक मिळाला नाही आणि ते आश्वासनसुद्धा पाळलं गेलं नाही.”

“मी अत्यंत प्रामाणिकपणे चॅनेलशी एकनिष्ठ राहून काम केलं. पण माझ्या कष्टाचा मोबदला मला मिळत नसेल, माझ्या प्रामाणिक कष्टाची अवहेलना जिथे होत असेल आणि नवख्या कलाकारांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असेल अशा ठिकाणी काम करणं माझ्या तत्त्वात बसत नाही. त्यामुळे मी या शोमध्ये न राहण्याचा निर्णय घेतला.”

“या पार्श्वभूमीवर, माझ्या जिव्हाळ्याच्या शेवंतातून मला बाहेर पडावे लागले. दुर्दैव आहे परंतु हा सर्वस्वी माझा वैयक्तिक निर्णय आहे. आयुष्य इथेच थांबले नाही. आणखीन काही नवीन रोल्स मी करत राहिन आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच सदैव होत राहील, अशी मी आशा करते. हीच एकमेव प्रेरणा आहे.” (अपूर्वा नेमळेकर)

हेही वाचा : Video: ‘दादा परत या ना, हसवा ना…’, भाऊ कदमच्या ‘पांडू’चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील ‘शेवंता’ च्या भूमिकेमुळे अपूर्वा घराघरांत लोकप्रिय झाली. अनेकांना नजरेने घायाळ करणारी आणि सौंदर्याने प्रत्येकाच्या डोळ्याचं पारणं फेडणारी अभिनेत्री म्हणून अपूर्वाने तिची एक वेगळीच ओळख निर्माण केली. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वात ‘शेवंता’ हे पात्र सर्वांचेच मुख्य आकर्षण ठरले होते. मात्र आता अपूर्वाने ही मालिका सोडल्यानंतर तिच्या जागी अभिनेत्री कृतिका तुळसकर ही ‘शेवतां’ची भूमिका साकारताना दिसणार असल्याचे बोललं जात आहे.