अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास सध्या सीबीआयची विशेष टीम करत आहेत. एकीकडे या तपासामध्ये अनेक नवनवीन गोष्टींचा खुलासा होत आहे. तर दुसरीकडे सुशांतचे नातेवाईक, मित्र परिवार सुशांतशी निगडीत अनेक गोष्टींवर भाष्य करत आहेत. यामध्येच सुशांतचा मृतदेह पाहिल्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अश्रु अनावर झाले होते आणि तिने सुशांतची माफी मागितली होती अशी नवीन माहिती समोर आली आहे. रुग्णालयातील कर्मचारी सुरजीत सिंह राठोड याने ही माहिती दिल्याचं ‘एबीपी न्युज’च्या वृत्तात म्हटलं आहे.

१४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर मुंबईतील रुग्णालयामध्ये त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला होता. यावेळी रिया सुशांतचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी रुग्णालयात गेली होती. मात्र रुग्णालयातील शवगृहात सुशांतला पाहिल्यानंतर रियाला अश्रु अनावर झाले आणि ती रडू लागली. इतकंच नाही तर तिने अखेर सॉरी बाबू असं म्हणत त्याची माफी मागितली होती.

“धोनी चित्रपटाचे असोसिएट प्रोड्युसर आणि सुशांतचा मित्र सूरज सिंह याच्यासोबत रिया रुग्णालयात आली होती. त्यावेळी सुशांतचे कुटुंबीय तिला सुशांतच्या अत्यंविधीमध्ये सहभागी होऊ देणार नाहीत म्हणून निदान एकदा तरी तिला सुशांतचा चेहरा पाहू दे असं सुरजने सांगितलं. त्यानंतर मी स्वत: रियाला शवगृहात घेऊन गेलो आणि सुशांतच्या चेहऱ्यावरील पांढरी चादर दूर करत तिला सुशांतचा चेहरा दाखवला होतो”, असं सुरजीतने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे तो म्हणतो, “सुशांतचा चेहरा दिसल्यावर रिया प्रचंड भावूक झाली आणि ती रडायला लागली. रडता रडता रियाने सुशांतला स्पर्श केला आणि ‘सॉरी बाबू’ असं म्हणाली. रिया साधारणपणे ५ मिनीटं सुशांतच्या मृत शरीराकडे पाहत होती. परंतु, त्यानंतर मी तिला बाहेर घेऊन आलो”.

दरम्यान, सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचं वाटत असल्याचंही सुरजीतने सांगितलं. सुशांतने १४ जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. सध्या या प्रकरणी सीबीआयची विशेष टीम तपास करत आहे.