शनिवार २ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर एनसीबीने छापा टाकला. या छाप्यामध्ये बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबत आणखी लोकांना ताब्यात घेण्यात आले. रविवारी आर्यनला एनसीबीने अटक केली. त्यानंतर आर्यनसह इतर सात जणांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे या सर्वांचा जामीन अर्ज फेटाळला असून ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर चर्चेत आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीने या संपूर्ण प्रकरणावर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
रिया चक्रवर्तीने काही तासांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. “तुम्ही ज्या गोष्टींमधून (परिस्थितीमधून) जात आहात त्यामधून शिकून पुढे मार्गक्रमण करत राहा,” अशी पोस्ट रियाने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केली आहे. रिया ही सोशल मीडियावर फार सक्रीय असते. ती अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रेरणादायी संदेश शेअर करत असते. नुकतंच तिने आर्यन खानच्या अटकेनंतर अशाप्रकारच्या आशयाची एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचे निधन होऊन एक वर्ष उलटलं आहे. त्याच्या निधनानंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण चर्चेत आलं होतं. यानंतर अनेक मोठमोठ्या कलाकारांची चौकशी करण्यात आली. सुशांत सिंह राजपूतसंबंधित ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीचे नावही समोर आले होते. याप्रकरणी १ महिन्यासाठी तिला तुरुंगवासाची शिक्षाही भोगावी लागली होती.
आर्यन खानसह ७ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई सत्र न्यायालयाने याआधी आर्यन खानसह इतर ७ आरोपींना एनसीबी कोठडी देण्याची मागणी फेटाळत त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं. याविरोधातच सध्या आर्यन खानकडून विशेष सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.