बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखचे वडिल म्हणजेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची नुकतीच पुण्यतिथी पार पडली. राज्यचं दोन वेळा मुख्यमंत्री पद सांभाळणाऱ्या दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावर आजही राज्यातील लाखो जनतेचं प्रेम आहे. रितेश देशमुखही आपल्या वडिलांसोबतच्या अनेक आठवणी सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. नुकत्याच झालेल्या विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने देखील रितेशने एक भावूक व्हिडीओ पोस्ट केला होता.
त्यानंतर आता रितेश देशमुखने विलासराव देशमुख यांच्या मुलाखतीचा आणखी एक जुना व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. यात विलासराव देशमुख आक्रमक स्वभावाबद्दल बोलत आहेत. सध्या राज्यसह देशात केंद्रिय मंत्री नारायण राणेंच्या आक्रमक वक्तव्यामुळे राजकारण पेटलेलं असताना रितेश देशमुखने नेमका त्याचवेळी शेअर केलेला व्हिडीओ लक्षवेधी ठरतोय. या व्हिडीओत विलासराव म्हणत आहेत, “माझे सर्वाशी प्रेमाचे संबध आहेत. माझ्या विरुद्ध बोलणाऱ्याशी किंवा टीका करणाऱ्यासोबतही मी प्रेमाने बोलतो किंवा वागतो. मी पटकन व्यक्त होणारा नाही, मी कृतीतून व्यक्त होतो. ”
हे देखील वाचा: शिक्षा नव्हे तर सलमान खानला विमानतळावर अडवणाऱ्या त्या CISF जवानाला मिळालं बक्षिस
पुढे आक्रमकतेवर विलासराव म्हणाले, “प्रत्येकाच्या कामाची पद्धत वेगळी असते. काही लोक अधिक आक्रमक असतात ते अनेकांना बरे वाटतात. मात्र माझा त्यावर विश्वास नाही. कारण मी त्या संस्कृतीतून आलेलो नाही. आपण शांतपणे आणि संयमाने राज्यकारभार करून लोकांशी वागलं पाहिजे.” हे सांगत असतानाच विलासराव देशमुख म्हणाले, “माझी ट्रीटमेंट ही अॅलोपथीसारखा शॉर्ट टर्म नाही, आयुर्वेदासारखी लाँग टर्म आहे.”
View this post on Instagram
नारायण राणे यांना मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. नारायण राणेंनी केलेल्या आक्रमक वक्तव्यामुळे राजकारण पेटलेलं असतानाच रितेश देशमुखने हा व्हिडीओ शेअर केल्याने नेटकऱ्याकडून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अनेकांनी व्हिडीओला पसंती दिलीय. तर काहींनी रितेश देशमुखला वडिलांप्रमाणेच राजकारणात सक्रिय होण्याच सल्ला दिलाय.