‘लय भारी’ या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया एकत्र येत ‘माऊली’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने याचा पोस्टर प्रदर्शित झाला होता. त्यानंतही रितेशने टीझरसुद्धा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला. आता या चित्रपटातील एका महत्त्वाच्या भूमिकेचा उलगडा रितेशने केला आहे.

‘हद्दीत राहायचं! दहशतीचं दुसर नाव, धर्मराज उर्फ नाना लोंढे येतोय,’ असं त्याने ट्विट केलं आहे. या ट्विटसोबतच त्याने या भूमिकेची झलकसुद्धा शेअर केली आहे. घारे डोळे आणि क्रोधित चेहऱ्याची झलक यामध्ये पाहायला मिळत आहे. ही खलनायकी भूमिका कोण साकारणार याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. अनेकांनी हा अभिनेता जितेंद्र जोशी असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

विशेष म्हणजे जितेंद्र जोशीने मंगळवारी सूचक ट्विट केलं होतं. ‘सेक्रेड गेम्सनंतर काय, असा प्रश्न अनेकांनी विचारला. त्याचं उत्तर उद्या मिळेल,’ असं त्याने ट्विट केलं होतं. त्याचं हे उत्तर म्हणजे ‘माऊली’ चित्रपट अशीही चर्चा आहे. रितेश आणि जितेंद्रच्या ट्विटने चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१४ डिसेंबरला रितेशचा हा चित्रपट प्रदर्शित होणात असून, आदित्य सरपोतदारने त्याच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ‘मुंबई फिल्म कंपनी’ आणि ‘हिंदुस्तान टॉकीज’च्या निर्मितीअंतर्गत साकारल्या जाणाऱ्या या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी अजय- अतुल या जोडीने घेतली आहे. त्यामुळे ‘माऊली’च्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्या संगीताने आसमंत दुमदुमणार असं म्हणणं वावगं ठरणार नाही.