आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला ‘द पिझ्झा’ हा हिंदी लघुपट ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित झाला आहे. हा लघुपट एकटेपणा आणि वृद्धत्व या दोन संवेदनशील विषयांवर भाष्य करणारा आहे. ए. के. शुक्ल या नावाचे ७५ वर्षीय वयोवृद्ध गृहस्थ ३ बीएचके फ्लॅटमध्ये एकटेच राहत असतात. ज्यांचा मुलगा ऑस्ट्रेलियात राहतो आणि त्यांच्या पत्नीचे चार वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. ते गृहस्थ एकटे राहत असल्याने आपला एकाकीपणा घालवण्यासाठी ते पिझ्झा ऑर्डर करतात. जो डिलिव्हरी बॉय त्यांच्याकडे पिझ्झा घेऊन येतो तो त्यांच्यापर्यंत फार गोंधळलेल्या मन:स्थितीत पोहोचतो कारण ‘शुक्ला’ आणि ‘शुक्ल’ या दोन आडनावात तो गडबडून जातो आणि त्याच प्रवासात ही कथा घडते व ते एकमेकांचे मित्र बनतात.  ‘‘भारतात एक-दोन माणसांमागे एक वयोवृद्ध आहे जो एकाकी होत चालला आहे. सध्या दहा-पंधरा वर्षांमध्ये हा फार मोठा सामाजिक प्रश्न होणार आहे. कुटुंबात राहूनही जे कुटुंबातूनच बाजूला झालेले आहेत, औषध-पाणी आणि जेवण ज्यांना व्यवस्थित उपलब्ध आहे पण त्यांना समजून घेणारे खूप कमी लोक आहेत असा एक वर्ग आहे तर एक दुसरा वर्ग आहे ज्यांची मुलं परदेशात आहेत आणि जे एकटेच मोठ्या घरामध्ये राहत आहेत. त्यामुळे एकटेपणा या भावनेला केंद्रस्थानी हा लघुपट तयार केला आहे’’, असं मत या लघुपटाचे लेखक-दिग्दर्शक महेंद्र डोंगरे व्यक्त करतात. दिग्दर्शक महेंद्र डोंगरे यांचा हा तिसरा लघुपट आहे. या लघुपटाची ‘इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल-बंगळूर’, ‘गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’, ‘फर्स्ट टाइम फिल्म मेकर्स सेशन-लंडन’, ‘इंडियन फिल्म हाऊस अवॉड्र्स-बंगळूर’, ‘मुंबई इंडियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये निवड झाली आहे. ‘इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल-बंगळूर’ येथे फोर्थ रनर अप लघुपट आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता, ‘गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये फर्स्ट रनर अप हे पुरस्कारदेखील मिळाले आहेत. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ए. के. शुक्ल हे पात्र आहे व त्यांची भूमिका राजन काजरोळकर यांनी केली आहे तर पिझ्झा बॉय म्हणजेच जाहिद खानच्या भूमिकेत क्षितिज भंडारी आहे. या लघुपटाचे संगीत व सिनेमॅटोग्राफी चैतन्य आपटे यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roaring at international film festival the pizza raha hai short film screened on ott media akp
First published on: 16-01-2022 at 00:10 IST