सध्या सोनी वाहिनीवरील ‘इंडियन आयडल पर्व ११’ हा शो चर्चेत आहेत. शोचा सूत्रसंचालक आदित्य नारायण आणि नेहा कक्करमुळे गेल्या काही दिवसांपासून शोच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. पण सध्या शो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेचा विषय बनला आहे. शोमधील महाराष्ट्राचा लाडका स्पर्धक रोहित राऊतने अभिनेत्री दिशा पटाणीला प्रपोज केल्यामुळे या सर्व चर्चा सरु आहेत.
नुकताच इंडियन आयडल पर्व ११मध्ये ‘मलंग’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अभिनेत्री दिशा पटाणी आणि आदित्य रॉय कपूर पोहोचले होते. दरम्यान सगळेच स्पर्धक दिशाला इंप्रेस करण्याचा प्रयत्न करत असतात. पण रोहित राऊतने थेट जाऊन दिशाला डान्स करण्यासाठी प्रपोज केले आहे. तसेच तिला इंप्रेस करण्यासाठी त्यांच्यामध्ये सुरु असलेल्या चढाओढीबद्दलही सांगतो. दिशा रोहितच्या बोलण्याने इंप्रेस होते आणि त्याच्यासोबत डान्स करण्यास होकार देते.
याव्यतिरिक्त आदित्य रॉय कपूरला देखील गाणे गाण्यासाठी सर्वजण विनंती करतात. तो सर्वांच्या विनंतीचा मान ठेवून गिटार घेऊन ‘आशिकी २’मधील गाणे गातो. तसेच कुणाल खेमू आणि अनिल कपूर यांनी देखील सेटवर एन्जॉय केल्याचे पाहायला मिळाले.
‘मलंग’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सूरीने केले असून चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी एकत्र केली आहे. या चित्रपटात आदित्य, दिशा पाटनी व्यतिरिक्त अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा एक रोमँटिक थ्रिलर चित्रपट असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे
