Rupali Ganguly Recalls Being Body Shamed : टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींना त्यांच्या वजनामुळे अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आता टीव्हीच्या टॉप अभिनेत्रींनपैकी एक असलेल्या रुपाली गांगुली यांनी त्या काळाची आठवण करून दिली, जेव्हा त्यांनाही बॉडीशेम केले जायचे.

रुपाली गांगुली यांनी सांगितले की, त्यांचे वजन ८३ किलोपर्यंत पोहोचले होते. त्यांनी आरशात स्वतःला पाहणे बंद केले होते. लोक त्यांना म्हणायचे की, ती खूप जाड झाली आहे. रुपाली म्हणाल्या की, जेव्हा २४ इंचांची कंबर ४० इंचांची होते तेव्हा खूप विचित्र वाटते.

रुपाली गांगुली काय म्हणाल्या?

‘टेली टॉक इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत गांगुली म्हणाल्या, “रुद्रांशच्या (त्यांचा मुलगा) जन्मानंतर माझे वजन ८३ किलो झाले आणि मी स्वतःला आरशात पाहू शकत नव्हते. बरेच लोक म्हणाले, “तू खूप जाड झाली आहेस. आपल्याला अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात, ज्यामुळे आपल्याला वाईट वाटते, विशेषतः जर तुम्ही एक महिला असाल तर.”

रुपाली पुढे म्हणाल्या, “मला आरशासमोर येण्याची हिंमत झाली नाही आणि अश्विन (त्यांचे पती) खूप दयाळू होता, तो माझ्यावर प्रेम करायचा. जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता तेव्हा तुम्ही शरीराकडे किंवा इतर कोणत्याही गोष्टीकडे पाहत नाही; पण मला वेगळे वाटायचे. जेव्हा तुमची कंबर २४ वरून ४० होते तेव्हा ते विचित्र वाटते.”

अभिनेत्री रुपाली गांगुली या वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. रुपाली  सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. त्याशिवाय त्या बऱ्याच भटक्या जनावरांचीही काळजी घेतात. रुपाली यांनी २०१३ मध्ये अश्विन वर्मा यांच्याशी लग्न केले. त्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांना रुद्रांश हा मुलगा झाला. अश्विनला त्याच्या मागील लग्नापासून दोन मुली आहेत.

रुपाली गांगुली यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्या बऱ्याच काळापासून स्टार प्लसवरील टॉप मालिका ‘अनुपमा’मध्ये मुख्य भूमिका साकारत आहेत. ‘अनुपमा’बद्दल बोलायचे झाले तर, अद्रिजा रॉय, शिवम खजुरिया, राहिल आझम, झलक देसाई आणि इतर अनेक कलाकारदेखील या शोमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. पाच वर्षांपासून हा शो टीआरपीमध्ये बऱ्याचदा अव्वल स्थानी असल्याचे पाहायला मिळाले होते. या मालिकेवरूनच मराठीत स्टार प्रवाहवर ‘आई कुठे काय करते’ मालिका बनवण्यात आली होती.