नागराज मंजूळे, सई ताम्हणकर, निखिल अडवाणी, विक्रमादित्य मोटवने कार्यकारी निर्माते लोकसत्ता प्रतिनिधी जगविख्यात ‘सनडान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ग्रँड ज्युरी पुरस्कार मिळवणारा रोहन परशुराम कानवडे दिग्दर्शित ‘साबर बोंडं’ या चित्रपटासाठी हिंदी आणि मराठीती नामांकित कलाकार एकत्र आले आहेत. या चित्रपटासाठी प्रसिद्ध चित्रपट निर्माते नागराज मंजुळे, निर्माता – दिग्दर्शक निखिल अडवाणी, अभिनेत्री सई ताम्हणकर आणि दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे. या निर्मात्यांचा पाठिंबा आणि प्रसिद्ध अभिनेता राणा दग्गुबाटी यांच्या ‘स्पिरिट मीडिया’ यांच्या संस्थेच्या वतीने ‘साबर बोंडं’ हा चित्रपट १९ सप्टेंबरला देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे. सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जगभरातून तब्बल १७ हजार चित्रपटांचे पुरस्कारांकरिता अर्ज आले होते. ‘साबर बोंड’ हा सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रवेश करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला. सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट प्रदर्शितही झाला. या चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेला हा पहिला मराठी चित्रपट ठरल्याने नवा इतिहास रचला गेला. ‘साबर बोंड’ हा चित्रपट आनंद नावाच्या शहरी तरुणाच्या आयुष्यभोवती फिरतो. या चित्रपटात अभिनेता भूषण मनोज, सूरज सुमन आणि जयश्री जगताप यांच्या भूमिका आहेत. प्रेम आणि मैत्रीच्या नाजूक बंधांचा या चित्रपटात हळूवारपणे वेध घेतला गेला आहे.

‘साबर बोंडं’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेता, निर्माता राणा दग्गुबाती यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘साबर बोंड’ चित्रपट पहिल्यांदा पाहिल्यावरच हा चित्रपट माझ्या मनात खोलवर रुजला. चित्रपटातील सर्व पात्रांमध्ये मूळ कथानक गुंफले गेले आहे. पात्रांतील कथानकातूनच हा चित्रपट जगातील कटू सत्य उलगडतो. रोहनने दिग्दर्शक आणि लेखक म्हणून पहिल्याच चित्रपटात दमदार कामगिरी केली आहे. सनडान्स चित्रपट महोत्सवातील ग्रँण्ड ज्युरी पुरस्कार मिळवल्याने या चित्रपटाने भारतीय सिनेमाची जगभरात दखल घ्यायला लावली. या चित्रपटाशी जोडले गेल्याने देशाच्या कानाकोप-यातील प्रेक्षकापर्यंत प्रभावी आणि मनाला भिडणा-या कथा पोहोचवण्याचे आमचे प्रयत्न प्रत्यक्षात साकारले जातील, असे राणा दुग्गुबाती यांनी सांगितले.

चित्रपटाला सिनेसृष्टीतील मातब्बर कलाकारांकडून भरभक्कम पाठिंबा मिळाल्याने दिग्दर्शक आणि लेखक रोहन परशुराम कानवडे यांनी सर्वांचे आभार मानले. ‘हा चित्रपट माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. ज्या लोकांनी, अनुभवांनी मला घडवले त्यातून हा चित्रपट साकारला गेला आहे. चित्रपटासाठी मूळ संकल्पना साकारण्यापासून ते सनडान्समध्ये सन्मान मिळवून आता हा चित्रपट मायदेशी परतला आहे. ‘साबर बोंड’ देशभरात प्रदर्शित होणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे’ असे रोहन यांनी सांगितले.