‘शोले’ हा सिनेमा रिलीज होऊन आज (१५ ऑगस्ट) ५० वर्ष झाली आहेत. आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. सिनेमातील प्रत्येक सीन, डायलॉग आणि कॅरेक्टर्स आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.

सिनेमाचं लोकेशनदेखील आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मोठ्या दगडांवर उभा असलेला गब्बर कोणीच विसरू शकत नाही. ‘शोले’ ज्या ठिकाणी शूट झाला, ते ठिकाण पाहण्यासाठी आजही लोक तिथे जातात. या चित्रपटात अभिनेता सचिन पिळगावकर यांनी रहीम चाचा यांच्या मुलाची भूमिका साकारली होती, ज्याबद्दल त्यांनी एक खास गोष्ट सांगितली आहे.

सचिन यांनी अलीकडेच आयएएनएसशी बोलताना सांगितले की, दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी चित्रपटातून त्यांचा खास सीन काढून टाकला होता आणि त्यामागील अनेक कारणे सांगितली होती. सचिन म्हणाले, “ज्या सीनमध्ये मला मारण्यात आले, ते गब्बरच्या अड्ड्यावर चित्रित करण्यात आले होते, परंतु रमेश यांनी काही कारणांमुळे एडिटिंगदरम्यान हा सीन काढून टाकला होता.”

पहिले कारण म्हणजे चित्रपट खूप लांबत होता, ज्यामुळे तो काढून टाकावा लागला आणि दुसरे म्हणजे, दिग्दर्शक रमेश यांना वाटले की १६-१७ वर्षांच्या मुलाची हत्या दाखवणे खूप विचित्र वाटेल. त्यानंतर शेवटच्या दृश्यात, गब्बरच्या हातावर एक काळी मुंगी चालताना दिसते, जी पाहून गब्बर म्हणतो, “रामगढ का बेटा आया है,” आणि नंतर तो त्या मुंगीला मारतो. यानंतर, माझ्या पात्राचा मृतदेह गावात दाखवला जातो, ज्यावरून माझ्या पात्राची हत्या झाल्याचे दिसून येते. तो एक सीन शूट करायला तब्बल तीन दिवस लागले, असं सचिन पिळगावकर म्हणाले.

सचिन पिळगावकर म्हणाले की, त्यावेळी एक अभिनेता म्हणून त्यांना ‘शोले’ चित्रपटातील या दृश्याच्या कटमुळे दुःख झाले. ते म्हणाले, “त्या वेळी मला खूप वाईट वाटले, कारण गब्बरबरोबर माझा एक खास सीन होता आणि तो काढून टाकण्यात आला होता. प्रत्येक अभिनेत्यालाही असेच वाटेल. पण, आज जेव्हा मी स्वतः एक दिग्दर्शक आहे, तेव्हा मला समजते की रमेशजींनी जे केले ते योग्य होते.”