दाक्षिणात्य सिनेसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी तिच्या अदांसाठी ओळखली जाते. अलीकडेच, तिच्या आगामी विराट पर्वम या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, साई पल्लवीने केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे. साई पल्लवीने बॉलीवूड चित्रपट द काश्मीर फाइल्समध्ये दाखवलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या दृश्याची मॉब लिंचिंगशी तुलना केल्याने नवा वाद सुरु झाला आहे. त्यामुळे वातावरण तापले आहे.

”द काश्मीर फाईल्स या सिनेमात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि नरसंहार दाखवण्यात आला. धार्मिक वादावर बोलायचं झाल्यास गाईंची तस्करी करून घेऊन जाणाऱ्या मुस्लिम चालकाला मारण्यात आलं, जय श्रीराम या घोषणा देण्यात आल्या. काश्मीरमध्ये जे घडलं त्यात आणि मॉब लिंचिंगच्या घटनेत काय फरक आहे? दोन्ही घटना सारख्याच आहेत.” असं साई पल्लवीने म्हटलं आहे. तिच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

“मी लहान होते तेव्हापासून मला शिकवलं गेलं आहे की एक चांगली व्यक्ती होण्याचा प्रयत्न कर. त्यामुळे मी तटस्थ राहणं पसंत करते. ज्यांच्यासोबत अन्याय होतो आहे, त्यांची मदत करणं. कुणी लहान कुणी मोठं असं काही नसतं, सगळे समान आहेत असं ज्या घरात शिकवलं गेलं त्या वातावरणात मी वाढले आहे. डावे आणि उजवे यांच्याविषयी मी ऐकलं आहे. पण त्यांच्यात कोण योग्य कोण अयोग्य हे मला सांगता येणार नाही. मला काश्मिरी पंडितांवर अन्याय करणारे आणि मॉब लिंचिंग करणारे सारखेच वाटतात. तेव्हा जे घडलं त्यात आणि मॉब लिचिंगच्या घटनांच्या वेळी जे घडलं त्यात काय फरक आहे?, असा सवाल साई पल्लवीने केला आहे.

“जर तुम्ही व्यक्ती म्हणून चांगले नसाल तर डावे किंवा उजवे असाल तरीही न्याय कुठेच नसेल. पण व्यक्ती म्हणून तुम्ही चांगले असाल तर तटस्थ म्हणून विचार करू शकता,” असंही साई पल्लवीने म्हटलं आहे.

सोशल मीडियावर गोंधळ

साई पल्लवीच्या या वक्तव्यानंतर तिला सोशल मीडियावर टीकेला सामोरे जावे लागत आहे. यादरम्यान एका ट्विटर युजरने ट्विट करून म्हटले की, ‘तुम्ही जे काही बोललात ते खूप चुकीचे आहे’. दुसरीकडे, दुसर्‍या युजरने म्हटले आहे की, ‘मला साई पल्लवीची स्टाइल आवडली, दक्षिण भारतीय कलाकार कधीही सत्य बोलण्यास मागेपुढे पाहत नाहीत’. साई पल्लवीच्या वक्तव्यावर अशा संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराट पर्वमध्ये सई एका नक्षलवाद्याच्या प्रेमात पडलेल्या तरुणीची भूमिका साकारत आहे. यात तिच्यासोबत राणा डग्गुबत्तीही मुख्य भूमिकेत आहे. हा तेलुगु चित्रपट १७ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील एका नक्षलवादी तरुणावर तिचे प्रेम असल्याने तिला कधी डाव्या विचारसरणीचा प्रभाव पडला आहे का, असे विचारले असता ती म्हणाली की मी कोणाच्याही बाजूने नाही.