बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सोशल मीडियावर काही ना काही कारणाने नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या चित्रपटांसंदर्भात केलेली वक्तव्य बरीच गाजली आहेत. लवकरच सैफ ‘विक्रम वेधा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक असून यात अभिनेता हृतिक रोशनचीही मुख्य भूमिका आहे. पण सध्या सैफची तुलना प्रसिद्ध अभिनेता आर माधवनशी केली जात आहे. कारण सैफ ‘विक्रम वेधा’मध्ये साकारत असलेली पोलीस अधिकाऱ्याची भूमिका दाक्षिणात्य चित्रपटात आर माधवनने साकारली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सैफ या तुलनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

सैफ अली खानला एका मुलाखतीत “आर माधनवशी तुझी तुलना केली जाते त्यामुळे तुला नर्व्हस वाटतं का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना सैफने ही तुलना होणार याची अगोदरपासूनच कल्पना असल्याचं सांगितलं. तो म्हणाला, “आर माधवनने ती भूमिका खूप उत्तम प्रकारे साकारली होती. तो एक उत्कृष्ट अभिनेता आहे आणि मी त्याचा आदर करतो. एकदा मला कुणीतरी सांगितलं होतं की, आपल्याला जेव्हा लोक स्टार म्हणतात तेव्हा अशा स्टार्सची एक आकाशगंगा आहे हे विसरू नये. त्यात असे खूप स्टार्स असतात. पण प्रत्येकाचं वेगळेपण असतं. त्यामुळे मला वाटतं मी माझ्या भूमिकेतून ते वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.”

आणखी वाचा- “मुलाचं नाव राम ठेवणार नाही…” सैफ अली खानचा जुना व्हिडीओ व्हायरल; नेटकरी संतापले

सैफ अली खान पुढे म्हणाला, “आर माधवनवर माझं नितांत प्रेम आहे. तो दाक्षिणात्य चित्रपटातील एक एक सीन जगला आहे. त्याने ज्या पद्धतीने ती भूमिका साकारली ती उत्तमच आहे. मी कधी नाटकांमध्ये काम केलं नाही. पण एखाद्या लोकप्रिय नाटकात नवीन कलाकार जुन्या कलाकारांच्या भूमिका साकारतात तेव्हा कसं वाटतं याची जाणीव मला आहे. माधवनने साकारलेली भूमिका मी साकारत असलो तरी त्यात माझं वेगळेपण दिसणार आहे.”

आणखी वाचा- दीपिका- कतरिना नाही तर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीवर होतं रणबीरचं प्रेम, पण…

दरम्यान हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट ३० सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. त्याच्या दक्षिण चित्रपटाची हिंदी आवृत्ती आधीच OTT वर उपलब्ध आहे. विजय सेतुपती आणि आर माधवन यांनी दाक्षिणात्य ‘विक्रम वेधा’मध्ये जबरदस्त अभिनय केला. आता बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची टक्कर ‘पोन्नियिन सेल्वन’शी होणार आहे. ज्याचं दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केलं आहे.