बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा २७ डिसेंबरला वाढदिवस होता. सलमानने काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पनवेल येथील फार्महाऊसवर त्याचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा करतानाचे सलमानचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. वाढदिवस साजरा केल्यानंतर आता सलमान पनवेलमध्ये चक्क रिक्षा चालवताना दिसत आहे. पण रिक्षा चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे सलमान खानला ट्रोल केले जात आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सलमानचा पनवेलमध्ये रिक्षा चालवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमानने निळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केल्याचे दिसत आहे. तसेच सलमान रिक्षा चालवत आहे हे पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केल्याचे देखील दिसत आहे. पण या व्हिडीओमुळे सलमानला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
Video: सलमान आणि जिनिलियाचा भन्नाट डान्स, पनवेल फार्महाऊसवरचा व्हिडीओ व्हायरल

सलमानचा रिक्षा चालवतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एका यूजरने हा व्हिडीओ पाहून ‘आता कुणाला उडवणार आहेस’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘सगळेजण बाजूला व्हा. मला फार्महाऊसवर जायचे आहे… त्या सापाला मारायचे आहे’ अशी मजेशीर कमेंट केली आहे. तर तिसऱ्या एका यूजरने ‘भाई मला कतरिनाच्या घरापर्यंत सोडून ये’ असे कमेंट करत म्हटले आहे.

वाढदिवसाच्या आधी सलमानला त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर सर्पदंश झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मीडिया समोर आल्यावर सलमान म्हणाला होता की, त्याला सगळ्यात पहिलं गिफ्ट हे त्या सापाने दिलं आहे. “माझ्या फार्महाऊसमध्ये साप घुसला होता. मी काठीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्याचवेळी तो साप माझ्या हाताजवळ आला. मी त्याला सोडण्यासाठी पकडले असता त्याने मला दंश केला. त्यानंतर तिथे गोंधळ झाला आणि त्या सापाने पुन्हा एकदा मला दंश केला असा त्यानं मला तीन वेळा दंश केला. तर सापाने केलेले हे कृत्य पाहता त्यानेच वाढदिवसाचं पहिलं गिफ्ट दिलं” असं सलमान म्हणाला होता.