Samay Raina Announces Comeback Tour: समय रैना काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळाले. कॉमेडीमुळे समय रैना लोकप्रिय ठरला आहे. त्याचा चाहतावर्ग मोठा असल्याचे दिसते. तसेच, त्याच्या कार्यक्रमांनादेखील प्रेक्षकांची गर्दी असते.

काही दिवसांपूर्वी समय रैनाच्या इंडिया गॉट लेटेंट या शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने केलेल्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर समय रैना, रणवीर अलाबादिया, आशीष चंचलानी, अपूर्वा मुखर्जी व ‘इंडिया गॉट लेटेंट’शी संबंधित इतरांवर केस दाखल करण्यात आल्या होत्या. तसेच यूट्यूब चॅनेलवरील इंडिया गॉट लेटेंटचे व्हिडीओ काढून टाकण्यात आले होते.

‘इंडिया गॉट लेटेंट’च्या वादानंतर समय रैना ‘या’ देशात करणार दौरा

आता समय रैना लवकरच पुनरागमन करणार आहे. समय रैनाने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने पुनरागमन करण्याकडे एक पाऊल टाकल्याचे म्हटले आहे. तो युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व यूकेचा दौरा करणार असल्याचे त्याने म्हटले आहे. ५ जून ते २० जून यादरम्यान त्याचा हा दौरा पार पडणार आहे.

‘इंडिया गॉट लेटेंट’चा उल्लेख करीत त्याने लिहिले की, माझ्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळ विनोदासाठी असतो. कार्यक्रमात भेटू, असे त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये लिहिले. समय रैनाच्या या पोस्टवर चाहत्यांनी आनंद व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. समय रैनाच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहे.

नेटकरी काय म्हणाले?

एका नेटकऱ्याने लिहिले, “भाऊ परत आला आहे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “आता उत्तर फक्त काम देणार”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “कमबॅक”, अनेक चाहत्यांनी कमबॅक असे लिहीत समयच्या पुनरागमनाबद्दल आनंदी असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच, चाहते कमेंट्सच्या माध्यमातून ‘इंडिया गॉट लेटेंट’चा पुढचा भाग कधी येणार आहे, असे विचारताना दिसतात.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच रणवीर अलाहाबादियानेदेखील पुनरागमनाची पोस्ट शेअर केली होती. तसेच कठीण काळात साथ दिल्याबद्दल त्याच्या जवळच्या लोकांचे तसेच चाहत्यांचे त्याने आभार मानले होते. त्याने त्याचे पॉडकास्ट पुन्हा सुरू केले आहे. रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये विविध क्षेत्रातील अनेक तज्ञांनी तसेच बॉलीवूड सेलेब्रिटींनी हजेरी लावली आहे.