‘डोंबिवली फास्ट’, ‘श्वास’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘अजिंक्य’ यांसारख्या चित्रपटातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणार अभिनेता संदीप कुलकर्णी आता निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहे. संदीप ‘डोंबिवली रिटर्न’ चित्रपटाची निर्मीती करत असून पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संदीपचा ‘डोंबिवली फास्ट’ चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील त्यानं साकारलेली माधव आपटे या भूमिकेनं सर्वाचं लक्ष वेधून घेतलं होतं. सर्वसामान्य माणसाचा असामान्य प्रवास या चित्रपटातून समोर आला. समीक्षकांसह प्रेक्षकांनीही या चित्रपटाला डोक्यावर घेतलं. अभिनेता म्हणून भूमिकेचे कंगोरे उलगडणारा संदीप आता निर्मिती संस्थेच्या माध्यमातून उत्तमोत्तम कलाकृती घडवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्याच करंबोला क्रिएशन्स या निर्मिती संस्थेअंतर्गत ‘डोंबिवली रिटर्न’ चित्रपटाची निर्मिती होणार आहे.

‘डोंबिवली रिटर्न ही आजच्या काळातली गोष्ट आहे. एका मध्यवर्गीय कुटुंबाची, सर्वसामान्य माणसाची गोष्ट आहे. या चित्रपटातून सायकोलॉजिकल थ्रिलर पाहायला मिळणार असंही संदीप म्हणाला. या चित्रपटाचं पोस्टर संदीपनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलं आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.