गेल्या अनेक दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत चर्चेत असलेला, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारित “संघर्षयात्रा” सिनेमा नवीन वर्षी लवकरच प्रदर्शित होणार आहे. तरुण दिग्दर्शक साकार राऊतने या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून सिनेमाची मुख्य संकल्पना आणि निर्मिती ओम सिद्धिविनायक मोशन पिक्चर्स व भाजप चित्रपट युनियनच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली असून सुर्यकांत बाजी, संदीप घुगे, मुकुंद कुलकर्णी आणि राजू बाजी हे या सिनेमाचे निर्माते आहेत.
गोपीनाथ मुंडेंच्या गाजलेल्या “संघर्ष यात्रे”चेच नाव या सिनेमाला देण्यात आले आहे. मुंडे साहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून एक दिवस आधी म्हणजेच ११ डिसेंबरला खरंतर हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार होता परंतु मुंडें साहेबांची कन्या, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिग्दर्शक आणि आम्हाला मार्गदर्शन करून काही उपयुक्त असे बदल सुचवले आहेत. त्यामुळे आम्ही ते बदल लवकरात लवकर पूर्ण करूनच हा सिनेमा प्रदर्शित करू तसेच या सिनेमाच्या निर्मितीपासूनच आम्ही साहेबांवर सिनेमा तयार करणार आहोत यांची पूर्व कल्पना आम्ही पंकज ताईना दिली असल्याचे ही सिनेमाच्या निर्मात्यांनी आवर्जून नमूद केले आहे.
“संघर्षयात्रा” सिनेमात गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय कारकीर्दीसह कौटुंबिक जीवनावरही प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. एक ऊस तोड कामगाराच्या घरातून सुरु होऊन देशाच्या ग्रामिकासासाठी मंत्रालयापर्यंत येऊन धडकणार्या विलक्षण अशा व्यक्तिमत्वाची कहाणी म्हणजे “संघर्षयात्रा” आहे. अभिनेता शरद केळकर याने गोपीनाथ मुंडेंची भूमिका साकारली असून अभिनेत्री श्रृती मराठेने पंकजा मुंडेंची भूमिका साकारली आहे. अभिनेता ओमकार कर्वे याने प्रमोद महाजन यांची तर दिप्ती भागवतने प्रज्ञा मुंडे यांची भूमिका साकारली आहे. गिरीश परदेशी यात प्रविण महाजन यांच्या भूमिकेत दिसणार असून प्रीतम कांगणेने प्रीतम मुंडे यांची भूमिका साकारली आहे.
“संघर्षयात्रा” हा सिनेमा लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jan 2016 रोजी प्रकाशित
‘आम्ही ‘ते’ बदल पूर्ण करूनच सिनेमा प्रदर्शित करू’
पंकजा मुंडे यांनी दिग्दर्शक आणि आम्हाला मार्गदर्शन करून काही उपयुक्त असे बदल सुचवले आहेत.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 02-01-2016 at 01:04 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangharshyatra will release soon