राजपूत संघटनेचा आक्षेप व मारहाण यामुळे मनस्ताप
‘पद्मावती’ या आपल्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एका राजपूत गटाने आपल्यावर केलेला हल्ला आणि चित्रपटाच्या सेट्सवर घातलेला धुमाकूळ हा प्रकार ‘अनावश्यक’ होता व त्यामुळे या सुंदर शहराच्या प्रतिमेचे अत्यंत नुकसान झाले आहे, असे सांगून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाचे चित्रीकरण रद्द केले आहे. दरम्यान, बॉलिवूडमधील चित्रपटांशी संबंधित सर्वजण भन्साळी यांच्या मागे एकवटले आहेत.
जयगड किल्ल्याच्या परिसरात सुरू असलेले चित्रीकरण निर्मात्याने थांबवले असून त्यांनी ही जागा रिकामी केली आहे, असे आमेर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र कुमार यांनी सांगितले. तर, या ‘धक्कादायक प्रकारानंतर’ चित्रीकरणात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात ठेवून दिग्दर्शकाने चित्रीकरण थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे भन्साळी यांच्या प्रतिनिधीने जारी केलेल्या निवेदनात सांगितले.
‘आक्षेपार्ह चित्रण नाही’
चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी याआधी दोन चित्रपटांचे चित्रिकरण जयपूरमध्ये केले आहे. राजस्थानविषयी त्यांना नेहमीच प्रेम आणि ओढ वाटते. चित्रपटात कोणतेही आक्षेपार्ह चित्रण नाही. मात्र असे असूनही शुक्रवारी झालेल्या प्रसंगानंतर चित्रिकरण थांबवून जयपूर सोडण्याचा निर्णय भन्साळींनी घेतला असल्याचे अधिकृत निवेदन शनिवारी देण्यात आले.