इफ्फीचे ज्युरी हेड नदव लॅपिड यांनी‘काश्मीर फाईल्स’या चित्रपटाला अश्लिल आणि प्रचारकी म्हटल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. लॅपिड यांच्या या विधानानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. असे असतानाच आता उद्धव ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत यांनी लॅपिड यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटात एका राजकीय पक्षाचा प्रचार केला गेला. तर दुसऱ्या राजकीय पक्षाच्या विरोधात मतं मांडण्यात आली. या चित्रपटानंतर काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवरील हल्ले वाढले, असे राऊत म्हणाले आहेत. ते आज (२९ नोव्हेंबर) मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >> ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटावरील नव्या वादात जितेंद्र आव्हाड यांची उडी, म्हणाले “मुस्लीमविरोधी काश्मीर फाईल्स…”

“या चित्रपटात एकाच पक्षाचा प्रचार करण्यात आला. काश्मीर फाईल्स या चित्रपटाचा एका राजकीय पक्षाने गाजावाजा केला. त्यानंतरच काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांच्या हत्या झालेल्या आहेत. गेल्या वर्षाभरात काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवरील हल्ले वाढले आहेत. या सिनेमावर निर्मात्यांनी कोट्यवधी रुपये कमावले. यातील काही रक्कम ही काश्मिरी पंडितांच्या अनाथ कुटुंबांना द्यावी, अशी मागणी आम्ही केली. मात्र त्यावर ते काहीही बोलत नाहीयेत. ज्या-ज्या राज्यात भाजपाचे सरकार आहे, तेथे या चित्रपटाचा प्रचार करण्यात आला,” असे संजय राऊत म्हणाले.

काश्मिरी पंडितांना, सुरक्षा रक्षकांना मारण्यात आले. यावेळी काश्मीर फाईल्स चित्रपटाची निर्मिती करणारे कोठे होते. काश्मिरी पंडितांची अनाथ मुलं आक्रोश करत होते, असेही संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा >> चित्रा वाघ यांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल, म्हणाल्या “असे कितीही आडवे आले तरी…”

नदव लॅपिड यांचे जितेंद्र आव्हाडांकडून समर्थन

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी इफ्फीचे ज्युरी हेड नदव लॅपिड यांचे समर्थन केले आहे. “तो इस्रायली असल्याने मुस्लीमविरोधी ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपट चालवून घेईल अशी सरकारची अपेक्षा होती. पण “प्रचारकी आणि गलिच्छ” चित्रपट म्हणून मुख्य परीक्षक नदव लॅपिड यांनी सणसणीत चपराक लगावली,” अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली.

इफ्फीचे ज्युरी हेड नेमकं काय म्हणाले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोव्यातील पणजी येथे सुरु असलेल्या कार्यक्रमात इस्त्रायलच्या चित्रपट दिग्दर्शकाने ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर जोरदार टीका केली. “काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण विचलित आणि त्रस्त आहोत. हा चित्रपट आम्हाला घाणेरडा तसंच प्रचार करणारा वाटला. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवणं योग्य नाही. मी माझ्या भावना या मंचावर मोकळेपणाने मांडू शकतो. ही चर्चा होणं गरजेचं आहे. मनात कोणतीही शंका न ठेवता ही चर्चा होणं कलेसाठी गरजेची आहे,” असं ते म्हणाले.