Sanju Rathod Amravati Concert Viral Video : ‘गुलाबी साडी’ असो किंवा ‘शेकी’ संजू राठोडच्या प्रत्येक गाण्याने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अलीकडच्या काळात संजूची प्रत्येक गाणी सोशल मीडियावर सुपरहिट ठरतात. एवढंच नव्हे तर नेटकऱ्यांप्रमाणे मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटींना सुद्धा संजूच्या व्हायरल गाण्यांची भुरळ पडत असल्याचं पाहायला मिळतंय.
‘शेकी’ गाणं जगभरात ट्रेंड झाल्यावर संजूने साधारण महिन्याभरापूर्वी त्याचं ‘सुंदरी’ हे नवीन गाणं रिलीज केलं. या गाण्याला सुद्धा प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.
गेल्या काही वर्षात संजूने मराठी संगीत विश्वाला एक वेगळी दिशा दिली आणि आपल्या मातृभाषेतील गाणी जगभरात सुपरहिट करून दाखवली. आता त्याच्या लोकप्रियतेत तुफान वाढ झालेली आहे. नुकताच संजूचा ग्रँड कॉन्सर्ट अमरावतीमध्ये आयोजित करण्यात आला होता. या इव्हेंटला संजूच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती.
संजूने अमरावतीत पार पडलेल्या या कॉन्सर्टमध्ये त्याची विविध गाणी सादर केली. त्याने ‘एक नंबर, तुझी कंबर’ म्हणत ‘शेकी’ गाणं गायला सुरुवात केल्यावर या कॉन्सर्टमध्ये एका खास अभिनेत्रीची एन्ट्री झाली. ती अभिनेत्री म्हणजेच ‘शेकी गर्ल’ ईशा मालवीय. या मूळ गाण्यात सुद्धा ईशा झळकली आहे. या दोघांनी मिळून अमरावतीचा कॉन्सर्ट गाजवल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
संजूच्या कॉन्सर्टमध्ये भरजरी लेहंगा घालून ईशाने ‘शेकी’ गाण्यावर ठेका धरला होता. याशिवाय शेकीमधील हुकस्टेपनुसार अगदी सेम टू सेम डान्स यावेळी ईशाने केला. ईशाची जबरदस्त एनर्जी पाहून सगळेच थक्क झाले होते. संजू अन् ईशाचे कॉन्सर्टमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
हा कार्यक्रम संपल्यावर ईशा ‘बिग बॉस मराठी’चा विजेता व अभिनेता शिव ठाकरेच्या घरी सुद्धा गेली होती. यावेळी शिवच्या कुटुंबीयांनी तिचं औक्षण करून स्वागत केल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, कॉन्सर्टला दिलेल्या प्रतिसादाबद्दल संजू राठोडने चाहत्यांचे आभार मानले आहेत. आता ‘शेकी’, ‘सुंदरी’ या गाण्यांनंतर संजू कोणतं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार…याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
