रेश्मा राईकवार

मराठीत उत्तमोत्तम चित्रपट दिलेल्या दिग्दर्शक समीर विद्वांसचा पहिला हिंदी चित्रपट म्हणून ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाबद्दल अंमळ अधिक उत्सुकता आहे. हिंदी चित्रपटांची निर्मितीमूल्यांसह अन्य व्यावसायिक गणितं चोख असतात, मात्र व्यावसायिकतेच्या चौकटीत राहून उत्तम आशय देणं हे आव्हान इथे प्रत्येक दिग्दर्शकासमोर असतं. मराठी दिग्दर्शकांची तंत्रावर आणि आशयावरही पकड असते हे त्यांनी आजवर सिद्ध केलं आहे. त्यामुळे इथे आपला पहिला हिंदी चित्रपट दिग्दर्शित करतानाही नुसताच प्रेमपट न करता त्यातून काही एक विषय मांडण्याचा प्रयत्न समीर विद्वांस यांनी केला आहे. अर्थात, चोख आशय आणि व्यावसायिक ठोकताळे यांचा तोल जरा गडबडल्याने ‘सत्यप्रेम की कथा’चा डौल थोडा कमी झाला आहे.

‘सत्यप्रेम की कथा’ म्हणजे इथे चित्रपटाच्या नायकाचे नावच सत्यप्रेम आहे आणि नायिकेचे नाव कथा आहे. त्यामुळे सत्यप्रेम आणि कथा यांच्यातील प्रेमाचं अद्वैत कसं साधलं गेलं याची ही कथा आहे. सत्यप्रेम नावाप्रमाणेच सत्य बोलणारा आहे त्यामुळे त्याच्या सच्च्या प्रेमाची ही गोष्ट आहे असंही म्हणता येईल किंवा ही दोन वेगवेगळय़ा संस्कृतीत वाढलेल्या आणि एका विचित्र परिस्थितीत एकत्र आलेल्या दोघांच्या खऱ्या प्रेमाची गोष्ट आहे असंही म्हणता येईल. थोडक्यात यात प्रेमाची गोष्ट आहे हे सत्य आहे आणि बाकी त्या कथेचे असे अनेक पदर असल्याने नेमकं काय यात थोडा गोंधळ उडाला आहे. गुजराती मध्यमवर्गीय कुटुंबातील सत्यप्रेम (कार्तिक आर्यन) वकिलीचं शिक्षण अर्धवट राहिल्याने आणि बाकी काहीच करत नसल्याने घरी भांडी घासण्यापासून सगळी कामं निमूट करतो आहे. सत्यप्रेमची आई आणि बहीण दोघींच्या नृत्याच्या क्लासेसच्या जोरावर त्यांचं घर चालतं. सत्यप्रेम आणि त्याचे वडील यांचं नातं खूप घट्ट आहे. तर असा हा सत्यप्रेम गरब्याच्या एका कार्यक्रमात कथाला (कियारा अडवाणी) पाहतो आणि पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडतो. कथाच्या मनातली गोष्ट कळल्यानंतर त्याच्या प्रेमाची गोष्ट अर्धवट राहते. मात्र तीही पूर्ण व्हायची संधी एका विचित्र क्षणी त्याच्या आयुष्यात येते. सत्यप्रेम आणि कथा यांच्या विवाहानंतर खरी गोष्ट सुरू होते.

दोन वेगवेगळय़ा संस्कृतीत वाढलेल्यांचं प्रेमात बांधलं जाणं हे चित्रपटातून आपण पाहिलेलं आहे, मात्र तरीही त्यातलं प्रासंगिक नाटय़ वास्तवदर्शी पद्धतीने पाहणं हेही रंजक ठरलं असतं. इथे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. दोघांनीही एकमेकांना त्यांच्या कडवट भूतकाळासह स्वीकारणं हेही यातलं नाटय़ प्रभावी ठरलं असतं. मात्र वर म्हटल्याप्रमाणे या चित्रपटाला एक कथाविषय जोडण्याचा प्रयत्न लेखक करण शर्मा आणि दिग्दर्शक समीर विद्वांस या जोडीने केला आहे. लैंगिक संबंधांसाठी स्त्रीची सहमती असणे आवश्यक आहे. शारीरिक संबंधांसाठी स्त्रीचा नकार असला तरी तिच्यावर केली जाणारी जबरदस्ती हा इथे मुख्य विषय आहे. विषयाच्या अनुषंगाने खरं तर कथाची व्यथा इथे केंद्रस्थानी असायला हवी. मात्र एकतर हिंदी चित्रपटांची व्यावसायिक चौकट सांभाळण्यासाठी असेल हा संपूर्ण चित्रपट सत्यप्रेमच्या नजरेतून उलगडत जातो. किंवा पुरुषांनी स्त्रीला समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून इथे स्त्रीपेक्षा पुरुषांमधील संवादावर अधिक भर असावा असंही असू शकतं. त्यामुळे सत्यप्रेम, त्याचे वडील आणि कथाचे वडील यांच्या भूमिका चित्रपटात ठळकपणे जाणवतात. त्या तुलनेत खुद्द कथा, कथाची आई, सत्यप्रेमची आई-बहीण या व्यक्तिरेखा चांगल्यम असूनही त्या दुर्लक्षित राहिल्या आहेत. त्यामुळे या एकूणच विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एकांगी वाटतो.

गुजराती कुटुंबाची पार्श्वभूमी कथेला आहे, त्यामुळे एकूणच सगळय़ा चित्रचौकटींची रंगसंगती, कथा-सत्यप्रेम यांची रंगीबेरंगी वेशभूषा, गुजराती संवाद, ढोकळा-फाफडा, गरबा-दांडिया असं बरंच काही ठासून भरलेलं आहे. ती रंगसंगती काही प्रमाणात सुखावणारी आहे. सत्यप्रेम आणि कथा यांच्यात अनेकदा होणारा अबोल संवाद, एकत्र येऊनही असलेला दुरावा किंवा एकमेकांत मिसळून जाण्यासाठी दोघांची होत असलेली तगमग अशा कित्येक भावछटा दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी अचूक पकडल्या आहेत. प्रेमकथा पुढे नेण्यासाठी आवश्यक असलेल्या गाण्यांचाही सुरेख वापर काही ठिकाणी झाला आहे. तर काही ठिकाणी नुसता गुज्जू शैलीतील धमाका आहे. अभिनयाच्या बाबतीत गजराज राव, सुप्रिया पाठक, शिखा तलसानिया, सिद्धार्थ रांदेरिया, अनुराधा पटेल अशी हिंदी-गुजरातीतील अनुभवी कलाकारांची फौज चित्रपटात आहे. कार्तिक आर्यनने गजराज आणि सिद्धार्थ या दोघांबरोबरचं समीकरण अफलातून जुळवलं आहे. हा संपूर्ण चित्रपट एकाअर्थी त्याच्या खांद्यावर आहे आणि त्याने तो उत्तम पेलला आहे. त्या तुलनेत कियारा अडवाणी काहीशी बाजूला पडली आहे. आणि सुप्रिया पाठक-शिखा तलसानिया यांच्या वाटय़ाला फार काही आलेलं नाही, निर्मिती सावंत यांचा प्रवेशही सुखावणारा असला तरी इतकंच.. अशी भावना त्यांची भूमिका पाहून होते. समीर विद्वांस यांची दिग्दर्शनाची शैलीच वेगळी आहे त्यामुळे एरवीच्या बॉलीवूडी प्रेमकथांच्या गर्दीत ‘सत्यप्रेम की कथा’ उजवा ठरतो आणि काहीसा तजेलाही देऊन जातो.

सत्यप्रेम की कथा

दिग्दर्शक – समीर विद्वांस कलाकार – कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी, गजराज राव, सुप्रिया पाठक, शिखा तलसानिया, सिद्धार्थ रांदेरिया, अनुराधा पटेल.