बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आणि अभिनेत्रींसोबत काम केले आहे. मुंबईत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट सुरू झाले आहे. यावेळी त्याने करण जोहरच्या चित्रपटाची ऑफर नाकारल्याचा किस्सा सांगितला आहे.
जेव्हा जेव्हा शाहरुख खानचे नाव एखाद्या चित्रपटाशी जोडले जाते तेव्हा किंग खानच्या चाहत्यांमध्ये तो चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढते. ‘पठाण’ आणि ‘जवान’ या चित्रपटांच्या यशानंतर, त्याचे चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्ट्ची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या अभिनेत्याने प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर यांच्या चित्रपटाला नकार देण्याचा किस्सा शेअर केला आहे.
स्क्रिप्ट ऐकताच चित्रपटाची ऑफर नाकारली
वेव्हज समिट आज सुरू झाले आणि त्याच्या एका पॅनेल चर्चेत शाहरुख उपस्थित होता. या चर्चेदरम्यान त्याने सांगितले की, “करण जोहर एका चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन माझ्या घरी आला होता, ज्यामध्ये मला संपूर्ण चित्रपटात स्कर्ट घालावा लागणार होता, याच कारणामुळे मी त्या चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला. खरंतर हा त्या जुन्या चित्रपटांपैकी एक होता, जिथे पुरुष स्कर्ट घालायचे. पण, माझ्यासारख्या स्टारने स्कर्ट का घालावे?
यावर स्पष्टीकरण देताना करण म्हणाला की, “शाहरुखला चित्रपटात स्कर्ट घालायचा होता, पण ही या चित्रपटाची गरज होती.” यावर प्रतिक्रिया देताना शाहरुखने गमतीने म्हटले, “त्या भूमिकेसाठी तू स्वतः स्कर्ट घालून, स्वतः अभिनय करायला हवा होता.”
यासोबतच शाहरुख खान फ्लॉप चित्रपटांबद्दलही बोलला आणि पुढे म्हणाला, “जेव्हा माझा कोणताही चित्रपट फ्लॉप होतो, तेव्हा मला खूप वाईट वाटते. कारण मला वाटतं की, बरेच लोक चित्रपटातून त्यांचे मनोरंजन होईल अशा अपेक्षा घेऊन येतात; पण जेव्हा त्यांच्या अपेक्षा भंग होतात तेव्हा मला खूप वाईट वाटतं की मी एक वाईट चित्रपट दिला आहे. मला वाटतं मी त्यांचा विश्वासघात केला आहे. मग मी बाथरूममध्ये जाऊन रडतो. मी एक-दोन दिवस असाच उदास राहतो. मला वाईट वाटतं आणि रडावंसं वाटतं.”