बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खानच्या बॉलिवूड कारकिर्दीला ३० वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं नुकतंच त्यानं सोशल मीडियावर लाइव्ह सेशन केलं होतं. या लाइव्ह सेशनमध्ये त्यानं चाहत्यांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. यात त्याला सलमान खानबद्दलही प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्यानं या प्रश्नाचं उत्तर देताना सलमानबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. यासोबतच आतापर्यंत सलमानसोबत काम करताना काय अनुभव आला हे देखील सांगितलं.

शाहरुखच्या एका चाहत्यानं त्याला सलमान खानसोबत काम करण्याचा अनुभव विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुख खान म्हणाला, “सलमान खानसोबत काम करताना मला कोणताही अनुभव नाही. फक्त प्रेम आहे, आनंद आहे, मैत्री आहे आणि भावासारखं नातं आहे. त्याच्यासोबत काम करणं नेहमीच उत्तम होतं. पण आमची मागची दोन वर्षं खूपच खास आहेत कारण तो माझ्या चित्रपटांमध्ये दिसला आणि मी देखील त्याच्या चित्रपटात दिसणार आहे.”

आणखी वाचा- “माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस…”, सिद्धार्थ जाधवची ‘ती’ पोस्ट चर्चेत

सलमानबद्दल बोलताना शाहरुख पुढे म्हणाला, “आम्ही दोघांनीही ‘करण अर्जुन’ व्यतिरिक्त कोणताही मोठा चित्रपट केलेला नाही. या चित्रपटातही आम्ही फक्त ४-५ दिवस एकत्र शूटिंग केलं होतं. पण लवकरच मी त्याच्या ‘टायगर’मध्ये दिसणार आहे. जसं तो माझ्या ‘झीरो’मध्ये दिसला होता. सलमान माझ्या कुटुंबाचा भाग आहे आणि मला माझ्या भावासारखा आहे. फक्त आम्हाला हे माहीत नाही की आमच्यापैकी नक्की मोठा भाऊ कोण आहे. जो कोणी चूक करतो किंवा संकटात असतो त्याला दुसरा मदत करतो असं आमचं बॉन्डिंग आहे.”

दरम्यान मधल्या काही वादांमुळे सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यात दुरावा आला होता. काही वर्षं दोघंही एकमेकांशी बोलत नव्हते. मात्र आता त्यांच्यातील वाद संपले असून पुन्हा एकदा प्रेक्षकांना आणि चाहत्यांना त्यांच्यातील बॉन्डिंग पाहायला मिळत आहे. अलिकडच्या काळात दोघंही एकमेकांच्या चित्रपटांचं प्रमोशन करताना देखील दिसले आहेत. शाहरुख खानच्या कामाबद्दल बोलायचं तर तो आगामी काळात ‘पठाण’ आणि ‘जवान’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे राजकुमार हिरानी यांचा ‘डंकी’ हा चित्रपट देखील आहे.