अभिनेते शरद पोंक्षे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. ते अभिनयाव्यतिरिक्त व्याख्यानही देतात. त्यांच्या व्याख्यानाचे व्हिडीओ ते सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करत असतात. नुकताच त्यांनी एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत त्यांनी दिवंगत गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या म्हणण्यानुसार गाणी गायली, असा उल्लेख केलाय. लतादीदींना सावरकरांच्या अभिनव भारत संघटनेत सहभागी व्हायचं होतं, पण सावरकरांनी त्यांना त्यासाठी नकार देत गाणी गाऊन देशसेवा करण्यास सांगितलं, असं शरद पोंक्षे यांनी त्यांच्या व्हिडीओत म्हटलंय.

शरद पोंक्षे त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत म्हणतात, “लता मंगेशकर तरुण असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटायला गेल्या होत्या. मला क्रांती करायची आहे, तुमच्या अभिनव भारत संघटनेत सहभागी व्हायचंय, असं त्या सावरकरांना म्हणाल्या होत्या. त्यावेळी सावरकर म्हणाले, तू वेडी आहेस का, तुला परमेश्वराने गाणं दिलंय. अतिशय उत्तम गळा दिलाय. साक्षात सरस्वती तुझ्या गळ्यामध्ये आहे. प्रत्येकाने क्रांतीच केली पाहिजे, असं नाही. क्रांती हातात शस्त्र घेऊनच केली जाते, हाही एक गैरसमज आहे. क्रांती फार वेगवेगळ्या पद्धतीने करता येते. तू अजिबात आमच्या अभिनव भारत संघटनेत येऊ नकोस, स्वतःचा जीव धोक्यात घालू नकोस. तुला जे दिलंय परमेश्वराने त्याचा वापर कर आणि हिंदुस्तानातील जास्तीत जास्त लोकांना आनंद देण्याचं काम कर. तुझ्या गाण्याने देशाची सेवा कशी करता येईल, याचा विचार कर. त्यानंतर लताबाईंनी फक्त या हिंदुस्तानालाच नाही तर संपूर्ण जगाला आपल्या स्वरांनी आनंद दिला,” असं शरद पोंक्षेंनी म्हटलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, लतादीदींना क्रांती करण्यासाठी सावरकरांच्या संघटनेत सहभागी व्हायचं होतं. पण क्रांती फक्त शस्त्रे हातात घेऊन नाही, तर वेगवेगळ्या पद्धतीने करता येते, त्यामुळे लतादीदींनी गाणी गाऊन देशसेवा करावी, असा सल्ला सावरकरांनी दिला होता, असं शरद पोंक्षे म्हणाले आहेत.