‘होणार सून मी या घरची…’ मालिकेतून प्रेक्षकांच्या घरा- घरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. अनेकदा त्याच्या सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होताना दिसतात. शशांकनं मराठी मालिकांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारून मराठी कलासृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. उत्तम नायक ते खलनायक अशा सर्वच भूमिका त्यानं साकारल्या आणि त्याचं बरंच कौतुकही झालं. त्यानंतर शशांक लवकरच एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

शशांक केतकर लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवरील नव्या मालिकेतून आणि नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्टार प्रवाहच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅन्डलवरून या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला असून या प्रोमोवरून शशांक पुन्हा एकदा नायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं समजतं. या मालिकेचं नाव ‘मुरंबा’ असं असणार आहे. सध्या या प्रोमोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

या प्रोमोमध्ये शशांकसोबत दोन नायिका पाहायला मिळणार असल्याचं चित्र दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला शशांक एका मुलीशी भांडताना दाखवलेला आहे. जी शशांकला पाहताच त्याच्या प्रेमात पडते. तर ‘माझ्या बेस्ट फ्रेंडशी का भांडतोस’असं म्हणत जेव्हा दुसरी मुलगी शशांकला जाब विचारते तेव्हा तो त्या मुलीच्या प्रेमात पडतो असं काहीसं चित्र या प्रोमोमध्ये दिसत आहे. त्यामुळे मालिकेमध्ये प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार की आणखी काही ट्वीस्ट याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मुरंबा’ मालिकेतून शशांक एका नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या १४ फेब्रुवारीपासून म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन डे’ला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये मालिकेबाबत कमालीची उत्सुकता दिसून येत आहे.