बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरुख त्याच्या दमदार अभिनयासोबत आणखी एका गोष्टीसाठी ओळखला जातो, तो म्हणजे त्याचा विनोदी स्वभाव. रिअॅलिटी शो, एखादा कार्यक्रम किंवा पत्रकार परिषदमध्ये समोरच्याला न दुखावता स्पष्टवक्तेपणाने आपले विचार मांडणं आणि उत्तम विनोदबुद्धी या दोन गुणांमुळे तो लोकांशी जास्त जोडला गेला आहे. याचंच एक उत्तम उदाहरण नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत पाहायला मिळालं. शाहरुखच्या ‘टेड टॉक्स’ या कार्यक्रमासंदर्भात ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती.
शाहरुखला प्रश्न विचारताना एका पत्रकार महिलेने अनवधानाने त्याचा उल्लेख ‘सलमान’ असा केला. त्यानंतर लगेचच त्या महिलेने माफीही मागत तिची चूक सुधारली. मात्र यावर शाहरुखने दिलेल्या प्रतिक्रियेनंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. शाहरुखने महिलेला तिचं नाव विचारलं. त्यावर ‘लिपिका,’ असं उत्तर तिने दिलं. ‘घाबरू नको दीपिका, असं होतं कधी कधी,’ असं म्हणत शाहरुखनेही चुकीच्या नावाचा उल्लेख केला. ‘ओह…मला माफ कर लिपिका,’ असंही त्याने म्हटलं. त्याच्या या विनोदबुद्धीमुळे तिथे उपस्थित सर्वजण हसू लागले.
वाचा : ट्विटरवर ‘रेपिस्ट’ म्हणणाऱ्या तरुणीला अर्जुन कपूरचं सडेतोड उत्तर
टेलिव्हिजनवर शाहरुखचा ‘टे़ड टॉक्स’ हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या परिषदेत शाहरुखला छोट्या पडद्यावरील सलमानच्या ‘बिग बॉस’, अक्षयच्या ‘द ग्रेड इंडियन लाफ्टर चँलेज’ आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमांशी असलेल्या स्पर्धेबाबत प्रश्न विचारला गेला. त्यावर ‘माझी कोणाशीही स्पर्धा नाही. सलमान आणि अक्षय त्यांच्या परीने चांगलं काम करत आहेत. त्यांचे शो माझ्या शोपेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे इथे एकमेकांशी स्पर्धा करण्याचा प्रश्नच येत नाही,’ असं उत्तर त्याने दिलं.