‘कांटा लगा’ या गाण्याने लाखो लोकांच्या मनावर राज्य केले. या गाण्यातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे शेफाली जरीवाला. या एकाच गाण्याने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलवले होते. शेफालीने या गाण्यापूर्वी तसेच यानंतर अनेक म्यूझिक अल्बममध्ये काम केले. मात्र आजही तिला कांटा लगा गर्ल म्हणूनच ओळखले जाते. २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या व्हिडीओमुळे शेफालीचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. एका रात्रीत स्टार बनलेली शेफाली त्यानंतर मात्र काही वर्षे सिनेक्षेत्रातून गायब झाली.

नुकतंच शेफालीने ‘ई टाईम्स’ या वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी तिने ती सिनेक्षेत्रापासून इतके वर्ष दूर का होती? तिने चित्रपटात काम का केले नाही? यासह अनेक गोष्टींवर स्पष्टीकरण दिले. “सिनेसृष्टीपासून दूर राहण्याचे प्रमुख कारण म्हणजे मला एपिलेप्सी म्हणजेच फिट्सचा त्रास आहे,” असे ती म्हणाली.

शेफाली जरीवाला हिने दिलेल्या माहितीनुसार, “वयाच्या १५ व्या वर्षी मला फिट्सचा पहिला झटका आला. मला आठवते की, त्यावेळी माझ्यावर चांगला अभ्यास करण्याचे दडपण होते. त्याचा तणाव आणि चिंता यामुळे मला फिट्सचा त्रास होऊ लागला. कधीकधी डिप्रेशनमुळेही तुम्हाला फिट्सचा त्रास होऊ शकतो. अनेकदा वर्गात असताना मला फिट्स यायच्या. कधी कधी स्टेजच्या मागे, तर कधी रस्त्याने चालतानाही मला फिट्स येत असे. या कारणामुळे माझा स्वाभिमान कमी झाला,” असे ती म्हणाली.

यापुढे शेफाली म्हणाली, “कांटा लगा’ नंतर अनेकांनी मला विचारले की मी सिनेसृष्टीत जास्त काम का केले नाही? पण आता मला सर्वांना सांगायचे की, फिट्सचा त्रास हे यामागचे कारण होते. याचमुळे मला जास्त काम करता आले नाही. मला फिट्स कधी येईल, याबद्दल मला काहीही सांगता येत नव्हते. यातच माझी १५ वर्षे गेली.”

“आज या आजारातून बरे होऊन मला ९ वर्षे झाली आहेत. मला स्वत: चा अभिमान आहे की, मी नैराश्य, पॅनिक अटॅक आणि चिंता यासारख्या गोष्टींचे नैसर्गिकरित्या व्यवस्थापन केले,” असेही तिने सांगितले.

Video: पोपटलालने अमिताभ यांच्याकडे व्यक्त केली ‘ही’ खास इच्छा, म्हणाला ‘माझे लग्न…’

‘कांटा लगा’ या गाण्यामुळे शेफालीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने अनेक म्यूझिक व्हिडीओमध्ये काम केले. तिने पराग त्यागीसोबत ‘नच बलिए ५’मध्ये देखील सहभाग घेतला होता. २०१८ मध्ये तिने ऑल्ट बालाजीची वेब सीरिज ‘बेबी’मध्ये काम केले. ती बिग बॉस १३मध्ये देखील भाग घेतला होता.