‘कांटा लगा’ या गाण्यातून लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे शेफाली जरीवाला. या एकाच गाण्याने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलवले होते. आता शेफालीने त्यावेळी या गाण्यात काम करण्यासाठी तिच्या वडिलांनी नकार दिला असल्याचा खुलासा केला आहे.

काही दिवसांपूर्वी शेफालीने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘कांटा लगा’ या गाण्याबद्दल बोलत जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘त्यावेळी मी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. त्यामुळे मी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावं असं माझ्या कुटुंबीयांना वाटत होते. पण मला या गाण्यामध्ये काम करायचे होते आणि त्यासाठी मला चांगले पैसे देखील मिळणार होते. मला त्यावेळी या गाण्यासाठी ७ हजार रुपये मानधन मिळाले होते. तसेच मला स्वत:ला टीव्हीवर पाहायचे होते’ असे शेफाली म्हणाली.

त्यानंतर शेफालीने ‘सुरुवातीला मला गाण्यात काम करण्यासाठी वडिलांनी नकार दिला होता. मी आईला विश्वासात घेऊन मला हे करायचे आहे असे सांगितले. त्यानंतर आम्ही दोघींनी मिळून वडिलांना समजावले. माझे गाणे हिट झाले आणि माझे संपूर्ण आयुष्य बदलले’ असे पुढे म्हटले.

‘कांटा लगा’ या गाण्यामुळे शेफालीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने अनेक म्यूझिक व्हिडीओमध्ये काम केले. तिने पराग त्यागीसोबत ‘नच बलिए ५’मध्ये देखील सहभाग घेतला होता. २०१८ मध्ये तिने ऑल्ट बालाजीची वेब सीरिज ‘बेबी’मध्ये काम केले. ती बिग बॉस १३मध्ये देखील भाग घेतला होता.