सेलिब्रिटी कपल शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे स्वामित्व हक्क असलेली होम शॉपिंग वाहिनी ‘बेस्ट डिल टीव्ही’चे भविष्य सध्या अंधारात असल्याचे चित्र आहे. शिल्पाचा नवरा राज कुंद्रा हा या कंपनीचा सीईओ होता. त्याने आता सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर व्यवसायात झालेल्या तोट्यामुळे कंपनीने काही काळासाठी व्यवहार बंद ठेवले होते. पण, गेल्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच कंपनी दिवाळखोर होण्याच्या मार्गावर होती, असा आरोप देशातील विक्रेत्यांनी केला आहे.

‘द इकॉनॉमिक टाइम्स’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने १५ डिसेंबरला ई मेलद्वारे त्याचा राजीनामा पाठविला होता. त्यात त्याने लिहले होते  की, ‘मी अधिकृतरित्या Best Deal TV च्या सीईओ पदावरून राजीनामा देत आहे. प्रत्येक चांगल्या गोष्टीचा एके दिवशी शेवट होतो, असे मला वाटते. आम्ही जवळपास इंडस्ट्री काबीज करण्याच्या मार्गावर होतो. नोटाबंदी हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय होता. पण, दुर्दैवाने तो आमच्या इंडस्ट्रीसाठी घातक ठरला’.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर बाजारात पैशांची कमतरता भासू लागल्याने कंपनीने डिसेंबर महिन्यात व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतला. ‘बेस्ट डिल टीव्ही’चे मुख्य कार्यकारी अधिकारी हरि त्रिवेदी यांनी सांगितले की, ‘कॅश ऑन डिलव्हरी व्यवहाराला कमी महत्त्व दिल्याने आम्ही कंपनीचे अंतर्गत खर्च उचलण्यास असमर्थ आहोत’. पण, कंपनीने गेल्या जानेवारीपासूनच आपली थकबाकी न दिल्याचा अनेक विक्रेत्यांनी दावा केला आहे. त्यावर त्रिवेदी म्हणाले की, ‘जानेवारी ते जून या महिन्यात ८० विक्रेत्यांचे ४.५ कोटी रुपयांचे देणे बाकी आहे. प्रवर्तकांसाठी ही काही मोठी रक्कम नाही. कुंद्रा परत येताच आम्ही विक्रेत्यांची थकबाकी रक्काम देऊन टाकू. आम्हाला बराच तोटा सहन करावा लागला आहे. पण, तरीही आम्ही वाटाघाटी करून थकबाकी देण्याचा प्रयत्न करत आहोत’.