बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर शिल्पा शेट्टीसंदर्भात अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. यानंतर शिल्पाची देखील चौकशी करण्यात आली होती. त्यामुळे तिला प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले होते. याच पार्श्वभूमीवर शिल्पा शेट्टीने दरवर्षीप्रमाणे यंदाही घरी विघ्नहर्ता गणपतीची प्रतिष्ठापना केली होती. यानंतर आता ती वैष्णोदेवीच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचली आहे. तिच्या वैष्णोदेवी यात्रेचे बरेच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
गेल्या आठवड्यात शिल्पा शेट्टीने घरी आणि ‘सुपर डान्सर’ या कार्यक्रमाच्या सेटवर गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली होती. यावेळी तिने वैयक्तिक आयुष्यात आलेले विघ्न दूर कर, अशी प्रार्थना गणपती बाप्पाकडे केली. त्यासोबतच काल बुधवारी शिल्पा शेट्टी जम्मूमधील वैष्णोदेवीच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचली होती. बुधवारी संध्याकाळी ५.३० दरम्यान तिने वैष्णोदेवीचा गड चढण्यास सुरुवात केली. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Jammu & Kashmir: Actor Shilpa Shetty visited Mata Vaishno Devi Shrine in Katra, yesterday pic.twitter.com/imYSyvKJy1
— ANI (@ANI) September 16, 2021
यावेळी वैष्णोदेवीच्या मंदिरापर्यंत पोहोण्यासाठी तिने घोड्यांचा वापरही केला. विशेष म्हणजे यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळाला. तसेच यावेळी शिल्पाने करोनाच्या सर्व निर्बंधाचे पालन केले होते. या संपूर्ण दौऱ्यात तिने तोंडावर मास्क परिधान केला होता. शिल्पा शेट्टीने देवीच्या दर्शनासाठी १३ किमी पायपीट केली.
मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा शेट्टी वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी हेलिकॉप्टरने जाणार होती. मात्र खराब वातावरणामुळे तिला मंदिरात पायी जावे लागले. यावेळी ती ‘जय माता दी’ असा जयघोषही करताना दिसली. “मी फार पूर्वीपासूनच वैष्णोदेवीची भक्त आहे. अनेकदा मी या मंदिरात येते. गेल्या काही काळापासून देवीने बोलवले नव्हते, त्यामुळे येणे झाले नाही,” अशी प्रतिक्रिया शिल्पाने या दौऱ्यादरम्यान दिली.