मल्याळम अभिनेता शाईन टॉम चाको याचा कुटुंबाबरोबर प्रवास करताना भीषण अपघात झाला. या अपघातात शाईनचे वडील सीपी चाको यांचे निधन झाले. आज शुक्रवारी (६ जून रोजी) सकाळी तामिळनाडूतील धर्मपुरीजवळ हा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी गाडीत शाईन, त्याचे आई- वडील, भाऊ आणि ड्रायव्हर होते.

शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास शाईन व त्याचे कुटुंबीय एर्नाकुलमहून बंगळुरूला जात असताना हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. कार व ट्रकच्या धडकेत गाडीतील सर्वजण जखमी झाले, त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातावेळी शाईन टॉम चाको गाडीच्या मागच्या सीटवर झोपला होता. त्याचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे. वृत्तानुसार, त्याची आई आणि भाऊ या अपघातातून बचावले. त्यांना कोणतीही मोठी दुखापत झाली नाही, पण त्याचे वडील या अपघातात ठार झाले आहेत.

कोण आहे शाईन टॉम चाको?

शाईन टॉम चाको हा मल्याळम चित्रपट क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेता आणि माजी सहाय्यक दिग्दर्शक आहे. त्याने अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक कमल यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. चाकोने २०११ मध्ये ‘खड्डामा’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पण, २०१९ मध्ये आलेल्या ‘इश्क’ या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेमुळे त्याला ओळख मिळाली. या चित्रपटासाठी, शाईन टॉमला २०१९ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेतील अभिनेता’ (मल्याळम) पुरस्कार देखील मिळाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ड्रग्ज कारवाईमुळे चर्चेत होता शाईन

२०१५ च्या ड्रग्ज प्रकरणातून निर्दोष मुक्त झालेला मल्याळम अभिनेता शाईन टॉम चाको एप्रिल महिन्यात पोलिसांनी केलेल्या छापेमारीमुळे चर्चेत राहिला होता. पोलिसांनी छापेमारी केल्यामुळे उत्तर एर्नाकुलममधील एका हॉटेलमधून पळून जाताना शाईन टॉम चाको सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.