‘दृश्यम’फेम श्रिया सरनने ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’मध्ये तिच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमकथेची एक कहाणी शेअर केली. चुकीच्या फ्लाइट बुकिंगमुळे ती तिचा पती आंद्रेई कोश्चीवला कशी भेटली हे तिने उघड केले. तेजा सज्जा आणि जगपती बाबू यांच्याबरोबर तिच्या ‘मिराई’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये आली तेव्हा तिने तिच्या प्रेमकथेबद्दल मोकळेपणाने सांगितले.

श्रिया सरनने शोमध्ये सांगितले की, ‘मी चुकीच्या महिन्यात चुकीची फ्लाइट बुक केली होती आणि मी मालदीवच्या दक्षिणेकडील क्रूझवर एकटीच पोहोचली आणि तिथेच माझी भेट आंद्रेईशी झाली.’

तिने पुढे सांगितले की, त्या वेळी एकमेकांबद्दल काहीही माहिती नसतानाही, या प्रवासादरम्यान नवीन अनुभवांमुळे ते मित्र बनले. तिने विनोदाने म्हटले, ‘त्याने पाहिलेला माझा पहिला चित्रपट ‘दृश्यम’ होता आणि त्यानंतर तो घाबरला होता.’ या भागात श्रियाच्या ‘मिराई’ चित्रपटातील सहकलाकार तेजा सज्जा, जगपती बाबू आणि रितिका नायक यांचाही समावेश होता, जिथे तेजाने विनोदाने जगपती बाबूला ‘रोमँटिक’ म्हटले.

श्रियाने असेही सांगितले की, तिने रशियन भाषादेखील शिकली आहे. ती म्हणाली, ‘मी आधी सर्व वाईट शब्द शिकले होते, पण आता मी माझ्या मुलीबरोबर रशियन भाषा शिकत आहे. आंद्रेईला हिंदी चांगली समजते. आंद्रेई भारतात आला होता आणि त्याला भारतीय कॉमेडी शो खूप आवडतात.’

मालदीवमध्ये भेटल्यानंतर श्रिया आणि आंद्रेई यांनी डेटिंग सुरू केली आणि मार्च २०१८ मध्ये त्यांच्या लोखंडवाला येथील घरी लग्न केले. या जोडप्याने २०२१ मध्ये त्यांची मुलगी राधाचे स्वागत केले आणि त्यांचे कुटुंब पूर्ण झाले. आंद्रेईबरोबरचे बरेच फोटो आणि व्हिडीओ श्रिया तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करताना दिसते.

कार्तिक सुब्बाराज दिग्दर्शित तमिळ रोमँटिक ॲक्शन थ्रिलर ‘रेट्रो’मध्ये श्रिया शेवटची दिसली होती, ज्यात सुरिया आणि पूजा हेगडे देखील होते. ती सध्या कार्तिक घट्टमनेनीच्या तेलुगू ॲक्शन फिल्म ‘मिराई’च्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटात श्रियाबरोबर तेजा सज्जा, मंचू मनोज, जगपती बाबू, रितिका नायक आणि जयराम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

श्रिया सरनने अनेक दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सुपरस्टार रजनीकांत यांच्याबरोबर ‘शिवाजी द बॉस’ चित्रपटातील भूमिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर श्रिया सरनला ‘दृष्यम’ चित्रपटामुळे स्टारडम मिळालं. अजय देवगणची पत्नी बनून श्रियानं चाहत्यांच्या मनावर वेगळी छाप पाडली.