Shruti Haasan On Cosmetic Surgery : श्रुती हासन सध्या रजनीकांत स्टारर ‘कुली’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. याबरोबरच ती कधीही तिचे मत मांडण्यास मागेपुढे पाहत नाही. आता एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीने तिला प्लास्टिक सर्जरीचे दुकान म्हणणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे.
टीएचआर इंडियाशी झालेल्या संभाषणात, श्रुती हासनने तिच्या कॉस्मेटिक सर्जरीबद्दल उघडपणे बोलल्यानंतर तिच्यावर झालेल्या टीकेबद्दल सांगितले. ती म्हणाली, “जेव्हा मी आवाज उठवला तेव्हा मला अशा कमेंट्स मिळाल्या, ‘अरे, ही प्लास्टिक सर्जरीची दुकान आहे.’ पण, मला माहीत आहे की मी काय आणि किती केले आहे आणि इतरांनी किती केले आहे. प्रामाणिकपणासाठी ही किंमत मोजावी लागते, ते ठीक आहे आणि मी कधीही त्याचा प्रचार करत नाही, ही माझी निवड आहे.”
श्रुती हासन कॉस्मेटिक सर्जरीबद्दल काय म्हणाली?
श्रुती हासन पुढे म्हणाली की, तिचे निर्णय पूर्णपणे वैयक्तिक होते आणि ते कधीही इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी नव्हते. ती म्हणाली, “प्रेमात, आयुष्यात, कामात जर तुम्ही खरे बोललात किंवा एखाद्या गोष्टीबद्दल खरे बोललात, तेव्हा बोटं नेहमीच तुमच्याकडे उचलली जातात. पण, त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते आणि मी ती मोजायला तयार आहे.”
कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर श्रुती हासन तिच्या लेटेस्ट चित्रपट ‘कुली’ च्या यशाचा आनंद साजरा करत आहे, ज्यामध्ये ती ज्येष्ठ सुपरस्टार रजनीकांत यांच्याबरोबर आहे. लोकेश कनगराज दिग्दर्शित, या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाने भारत आणि परदेशातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाने जगभरात ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाने आधीच वर्षातील सर्वात मोठ्या तमिळ ब्लॉकबस्टरपैकी एक म्हणून स्वतःची जागा निर्माण केली आहे.
श्रुती हासनने २००० मध्ये बालकलाकर म्हणून अभिनयास सुरुवात केली. त्यानंतर २००९ मध्ये अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. श्रुती हासनने ‘दिल तो बच्चा है जी’, ‘रमैया वस्तावैया’, ‘तेवर’, ‘गब्बर इज बॅक’, ‘वेलकम बॅक’, ‘रॉकी हँडसम’, ‘बहन होगी तेरी’, ‘देवी’ यांसारख्या हिंदी सिनेमांमध्ये काम केलं आहे. आता अभिनेत्री दाक्षिणात्य सिनेविश्वात सक्रिय आहे.