गायक राहुल वैद्य सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. बऱ्याचदा तो अनेक सामाजिक मुद्द्यांवर उघडपणे आपले मत व्यक्त करतो. विराट कोहली प्रकरणानंतर आता त्याने गणेशोत्सवादरम्यान श्रद्धा आणि भक्तीबद्दलचे आपले विचार सोशल मीडियावर व्यक्त केले आहेत. त्याने इन्स्टाग्रामवर काही पोस्ट शेअर करून म्हटले की, गणपतीच्या सणाला फॅशन शो बनवले आहे. राहुल वैद्यने त्यासंबंधित सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. हा उत्सव खरोखरच श्रद्धेशी संबंधित आहे की तो फॅशन शो बनला आहे, अशी चिंता आणि भीती राहुलने आपल्या पोस्टमार्फत व्यक्त केली.
अर्धे लोक फक्त फोटो काढण्यासाठी बाप्पाच्या मंडपात जात असतात, असे त्याने लिहिले. आता त्यामुळे सोशल मीडियावर गोंधळ उडाला आहे. त्याची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
राहुल वैद्यची इन्स्टाग्राम पोस्ट
राहुल वैद्य यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे, “जर इन्स्टाग्राम नसते, तर ५० टक्क्यांहून अधिक लोकांनी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केलीच नसती किंवा ते दर्शनासाठी गेले नसते. ते फक्त फोटो काढण्यासाठी जातात. सध्या माझ्या मनात याबद्दल गोंधळ आहे की, हा फॅशन शो आहे की गणपती दर्शन आहे.” या पोस्टनंतर लोकांनी गायकाला पाठिंबा दिला आहे आणि म्हटले आहे की, तो पहिल्यांदाच योग्य बोलला आहे. राहुल वैद्यची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

राहुल वैद्यने या वर्षी लालबागचा राजा येथे सादरीकरण करणारा पहिला गायक बनून इतिहास रचला आहे. त्याने २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गायकीचे सादरीकरण केले. इन्स्टाग्रामवर या खास क्षणाबद्दल राहुलने लिहिले होते, “मुंबईच्या अत्यंत प्रतिष्ठित लालबागचा राजा येथे सादरीकरण करणारा पहिला कलाकार ठरण्याचा मला आनंद आहे.” त्याच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर हा गायक ‘लाफ्टर शेफ २’मध्ये दिसला होता.