साऊथ सिनेइंडस्ट्रीतील गायिका सुचित्रा तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. सुचित्राने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने तिच्या बॉयफ्रेंडवर गंभीर आरोप केले आहेत.
सुचित्राने या व्हिडीओमध्ये घडलेली सर्व घटना सांगितली आहे. सध्या तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाच वर्षांपासून सुचित्रा आणि शुनमुगराज एकत्र राहत आहेत. दोघांचा साखरपुडादेखील झाला आहे. शुनमुगराजने सुचित्राला फक्त मारहाणच केली नाही, तर तिच्याकडून तिचं घर आणि पैसेदेखील हिसकावून घेतले आहेत. या नात्यात गायिकेला प्रेम नाही, तर फक्त हिंसा मिळाली आहे.
सुचित्रानं या व्हिडीओमध्ये सांगितलं की, शुनमुगराजनं तिची मेहनतीची कमाई चोरली आहे आणि तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला आहे. शुनमुगराज हा चेन्नई हायकोर्टात वकील असल्याचं म्हटलं जात आहे. सुचित्रानं या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणाली की, कर्म कसंही असो, मी एक स्त्री म्हणून हार मानणार नाही. शुनमुगराजने माझ्या मेहनतीचे पैसे चोरले, जे मी त्या गाण्यामधून मोठ्या कष्टाने कमावले, जे तुम्हाला आवडले. गाणं कठीण नाही; पण व्यावसायिकता टिकवून ठेवणं कठीण आहे.
ती पुढे म्हणाली, “एक हिंसक माणूस तेव्हाच खूप भयंकर वाटतो जेव्हा तो शारीरिकदृष्ट्या तुमच्या जवळ असतो. आता मी शुनमुगराजच्या शारीरिक अत्याचारांपासून दूर आहे. मला जाणीव झाली की, माझं स्वतःवर आणि माझ्या गाण्यांवर शुनमुगराजपेक्षा जास्त प्रेम आहे. मी त्याचा पाठलाग करेन जोपर्यंत तो माझा एकेक पैसा परत करीत नाही, तो पर्यंत मी लढेन.”
सुचित्राने आरोप केला आहे की, तिला शुनमुगराजनं अनेकदा मारलं आहे. मला प्रेम झालं. मला अनेक वेळा मारहाण झाली. तो मला WWE रेसलर सारख्या लाथा मारायचा. मी एका कोपऱ्यात बसून रडत बसायचे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे सुचित्राच्याच घरातून शुनमुगराजने तिला बाहेर काढले. त्यानंतर मुंबईत येऊन तिला नोकरी करावी लागली. याआधीदेखील सुचित्राने सोशल मीडियावर हिंसा होत असल्याचे संकेत दिले होते; पण तेव्हा लगेच पोस्ट डिलीट केली. पण आता सुचित्राने शुनमुगराजचे नाव घेत घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे.