२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राईज’ या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले. या चित्रपटाने जागतिक स्तरावर तगडी कमाई केली. जगभरामध्ये या चित्रपटाचे चाहते आहेत. अल्लू अर्जुनसह रश्मिका मंदाना, फहाद फासिल, सुनील अशा कलाकारांनी या चित्रपटामध्ये काम केले आहे. या चित्रपटामधील ‘श्रीवल्ली’, ‘उं अंटवा’, ‘सामी सामी’ अशी सगळीच गाणी खूप गाजली. तेलुगू व्यतिरिक्त हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमधील अनुवादित गाण्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. लवकरच या चित्रपटाचा पुढचा भाग ‘पुष्पा: द रुल’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटातील ‘सामी सामी’ हे गीत सर्वप्रथम यूट्यूबवर रिलीज करण्यात आले होते. तेव्हा गाण्याच्या व्हिडीओमध्ये चित्रीकरणादरम्यानची काही दृश्ये जोडण्यात आली होती. चित्रपटाची नायिका असलेल्या रश्मिका मंदानावर हे गाणं चित्रीत झाले आहे. या गाण्याची क्रेझ अजूनपर्यंत टिकून आहे. सध्या बऱ्याच कार्यक्रमांमध्ये हे गाणं सर्रास ऐकायला मिळते. या गाण्यावर लाखोंच्या संख्येने रिल्स आणि व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. नेपाळमधल्या शाळेतल्या एका मुलीचा या गाण्यावर नाचताना व्हिडीओ खूप जास्त व्हायरल झाला आहे. खुद्द रश्मिकानेसुद्धा हा व्हिडीओ शेअर केला होता.
अमेरिकन रॅपर स्नूप डॉग (Snoop Dogg)त्याच्या गाण्यांसह अतरंगी स्वभावामुळे सतत चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. नुकताच त्याने ‘सामी सामी’वर नाचणाऱ्या नेपाळच्या त्या मुलीचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने या व्हिडीओला कॅप्शन दिले नसल्याचे लक्षात येते. हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. एका यूजरने ‘हा व्हिडीओ तुमच्यापर्यंत पोहोचेल असे वाटले नव्हते, नेपाळमधून हॅलो’, अशी कमेंट केली आहे.
रश्मिका मंदानाने सुद्धा या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. तिने स्नूप डॉगने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली हसणारे इमोजी टाकून कमेंट केली आहे. तिच्या चाहत्यांनीही कमेंट करत त्यांचा प्रतिसाद दाखवला आहे.