Soha Ali Khan on Freezing Eggs at 35 : सोहा अली खान सध्या तिच्या ‘ऑल अबाउट हर’ या पॉडकास्टमुळे चर्चेत आहे. या पॉडकास्टमध्ये सोहा अली खान महिलांशी संबंधित विषयांवर मोकळेपणाने बोलत आहे. यादरम्यान, अभिनेत्रीने तिची मुलगी इनाया खेमूच्या जन्माबद्दल सांगितले की तिला वयाच्या ३५ व्या वर्षी बीजांड गोठवायचे होते.
सोहा म्हणाली की, जेव्हा ती ३५ वर्षांची असताना डॉक्टरकडे बीजांड गोठवण्यासाठी गेली, तेव्हा डॉक्टरांनी तिला सांगितले की ती म्हातारी झाली आहे. ती म्हणाली, “मी ३५ वर्षांची होते तेव्हा मी एका स्त्रीरोगतज्ज्ञाकडे गेले आणि मला माझे बीजांड गोठवायचे आहेत असे सांगितले. त्यांनी मला सांगितले की मी म्हातारी झाले आहे. बाकीचे सर्व जण म्हणायचे की मी खूप लहान आहे, पण ते म्हणाले, ‘तुमच्या अंडाशयांना तुमचा चेहरा दिसत नाही.’
‘ऑल अबाउट हर’ पॉडकास्टमध्ये सोहा म्हणाली की, डॉक्टरांच्या बोलण्याने तिला धक्का बसला. तिला खूप वाईट वाटले. यादरम्यान सनी लिओनीने तिच्या मुलांच्या जन्माची कहाणीही शेअर केली. सनी लिओनी आणि तिचा पती डॅनियल वेबर यांनी एका मुलीला दत्तक घेतले आणि नंतर सरोगसीद्वारे ते जुळ्या मुलांचे पालक झाले. सनीने सांगितले की, तिने खूप पैसे खर्च केले होते. तिने तिच्या मुलांच्या सरोगेट आईला मोठी रक्कम दिली होती.
सोहा अली खानने २०१५ मध्ये अभिनेता कुणाल खेमूशी लग्न केलं. सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांची भेट ‘ढुंढते रह जाओगे’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर २००९ मध्ये त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. २५ जानेवारी २०१५ रोजी सोहा आणि कुणालने लग्न केलं. त्यांना इनाया नावाची मुलगी आहे.
सोहा अली खान ही अनेकदा तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट, तसेच तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. सोहा अली खानने ‘दिल मांगे मोर’, ‘शादी नंबर १’, ‘खोया खोया चांद’, ‘दिल कब्बडी’, अशा चित्रपटांत काम केले आहे. पतौडी कुटुंबात जन्मलेली सोहा कोट्यवधींची मालकीण आहे. सिनेमांपेक्षा जाहिरात क्षेत्रात ती जास्त काम करताना दिसते.