राष्ट्रीय रायफल नेमबाजपटू कोनिका लायक हिने आत्महत्या केली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने कोनिकाला तिच्या खेळासाठी रायफल भेट दिली होती. २६ वर्षीय कोनिका लायक झारखंडच्या धनबादची रहिवासी होती. या नवोदित खेळाडूच्या निधनाने क्रीडा जगताला धक्का बसला आहे. विशेष म्हणजे तिच्या निधनानंतर सोनू सूदला जबरदस्त धक्का बसला आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला श्रद्धांजली वाहिली आहे.
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद गरजू व्यक्तींसाठी देव-दूत ठरत आहे. गरजू लोकांसह, स्थलांतरित मजुरांना प्रत्येक वेळेस सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय रायफल नेमबाजपटू कोनिका लायक हिनेही त्याच्याकडे रायफलसाठी मदत मागितली होती. सोनू सूदने कोनिकाला जर्मन बनावटीची रायफल भेट दिली. कोनिकाला पूर्वी जुन्या रायफल वापरायची. त्या रायफली तिच्या प्रशिक्षकांच्या किंवा मित्रांच्या असायच्या. राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ती त्याच जुन्या रायफलने शूटिंग करत असे. यामुळेच सोनू सूदने तिला राष्ट्रीय आणि इतर खेळांमध्ये भाग घेण्यासाठी एक रायफल भेट दिली.
रायफल मिळाल्यानंतर कोनिकाने ट्विट करत सोनू सूदचे आभार मानले होते. “सोनू सूद सर, माझी रायफल मिळाली. माझ्या कुटुंबासाठी हा आनंदाचा प्रसंग आहे आणि माझे संपूर्ण गाव तुमच्याप्रती आभार व्यक्त करत आहे. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो.” असे ट्वीट कोनिकाने केले होते.
हेही वाचा : राष्ट्रीय नेमबाज कोनिका लायकची आत्महत्या; अभिनेता सोनू सूदने भेट दिली होती रायफल
दरम्यान याच कोनिकाने निधनाचे वृत्त कळताच सोनू सूदनेही ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. “आज फक्त माझे नाही, संपूर्ण धनबादचे नाही तर पूर्ण देशाचे हृदय तुटले आहे,” असे ट्वीट सोनू सूद याने केले आहे. त्याचे हे ट्वीट सध्या चर्चेत आहे.
२६ वर्षीय कोनिका लायक झारखंडच्या धनबादची रहिवासी होती. माजी ऑलिम्पियन आणि अर्जुन पुरस्कार विजेते जयदीप कर्माकर यांच्यासोबत कोनिका कोलकाता येथे प्रशिक्षण घेत होती, असे सांगण्यात येत आहे. कोनिकाने वसतिगृहाच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. तिचे लवकरच लग्न होणार होते. पोलिसांना कोनिकाची सुसाईड नोट सापडली असून त्यात तिने नैराश्यामुळे आत्महत्या करत असल्याचे तिने म्हटले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.