Sonu Sood Sold his Luxury Apartment : बॉलीवूड अभिनेता सोनू सूदने आजवर अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारल्या आहेत. कोरोनाच्या काळात गरजू लोकांना मदत करून अभिनेता सोनू सूदने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोनू सूदने त्याची एक अपार्टमेंट विकल्याची माहिती समोर आली आहे.
सोनू सूदने मुंबईतील महालक्ष्मी येथील त्याची अपार्टमेंट विकली आहे. महालक्ष्मी हा मुंबईतील एक प्रसिद्ध परिसर आहे. सोनू सूदने तेथील त्याची ही अपार्टमेंट ८.१० कोटी रुपयांना विकली आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये हा व्यवहार नोंदणीकृत झाला.
आयजीआर कागदपत्रांनुसार, अभिनेत्याची अपार्टमेंट लोखंडवाला मिनर्व्हा येथे आहे. त्याचा कार्पेट एरिया १,२४७ चौरस फूट (११६ चौरस मीटर) आहे आणि बिल्टअप १३९.०७ चौरस मीटर (सुमारे १,४९७ चौरस फूट) आहे. त्यात दोन कार पार्किंग एरियादेखील आहेत. या करारात ४८.६० लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपयांची नोंदणी शुल्कदेखील समाविष्ट आहे. स्क्वेअर यार्डसने केलेल्या आयजीआर प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन कागदपत्रांच्या विश्लेषणावरून असे दिसून येते की, सोनू सूदने २०१२ मध्ये ५.१६ कोटी रुपयांना ही मालमत्ता खरेदी केली होती.
सोनू सूद या बंगल्यात राहत नव्हता;पण तो मुंबईतच एका मोठ्या आलिशान बंगल्यात राहतो, ज्याची किंमत सुमारे २० कोटी रुपये आहे. सुमारे एक महिन्यापूर्वी फराह खानने तिच्या यूट्यूब व्लॉगमध्ये सोनू सूदच्या घराची टूरदेखील दिली होती. त्याचा आलिशान बंगला पाहून फराहदेखील आश्चर्यचकित झाली होती. अभिनेत्याचे घर ‘ओम शांती ओम’ चित्रपटापासून प्रेरित होऊन बांधले गेले आहे. सोनू सूदने स्वतः फराह खानला हे सांगितले. सोनू सूदच्या घराची टूर करताना फराहने म्हटले होते की ते ‘ओम शांती ओम’च्या सेटसारखे आहे. त्यानंतर सोनूने सांगितले होते की, त्याने हे घर त्या चित्रपटापासून प्रेरित होऊन बांधले आहे.
सोनू सूद आज कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. पण, एक काळ असा होता जेव्हा तो अभिनयासाठी खिशात ५,५०० रुपये घेऊन मुंबईत आला होता आणि या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला होता. त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सोनू सूद शेवटचा ‘फतेह’ या चित्रपटात दिसला होता, जो या वर्षी जानेवारीमध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. त्यात अभिनयाबरोबरच त्याने निर्मितीसह दिग्दर्शनही केले होते. या चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवर त्याने एकूण १३.३५ कोटी रुपये कमावले. सध्या सोनूच्या कोणत्याही चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही.