बॉलीवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणात सूरज पांचोलीवर अभिनेत्रीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप होता. जियाने आत्महत्या केली तेव्हा ती सूरजबरोबर रिलेशनशिपमध्ये होती.
अशा परिस्थितीत जियाच्या आत्महत्येनंतर या प्रकरणात सूरजचे नाव येत राहिले, तो त्यात अडकू लागला. या प्रकरणात त्याला जवळजवळ एक दशक मीडिया ट्रायलचा सामना करावा लागला. दरम्यान, आता तो याबद्दल उघडपणे बोलला आहे. त्याने असेही म्हटले की, वयाच्या २० व्या वर्षी त्याला दहशतवाद्यासारखे वागवले गेले.
खरंतर सूरज पांचोलीने अलीकडेच वरिंदर चावलाच्या टीमशी संवाद साधला आणि यावेळी त्याने सांगितले की, जेव्हा मीडियाने त्याला खलनायक बनवले, तेव्हा तो फक्त २० वर्षांचा होता. त्याने सांगितले की त्याच्या अयशस्वी नात्यामुळे त्याला ‘दहशतवाद्यासारखे वागवले गेले.’ सूरज पांचोलीने या एकतर्फी कथेवर टीका केली आणि असा दावा केला की, कोणीही कथेची दुसरी बाजू पाहिली नाही किंवा घटनेचे नेमके कारण काय आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. त्याने असेही म्हटले की, त्याच्याविरुद्ध फक्त घाणेरडे आरोप करण्यात आले.
सूरज पांचोली पुढे म्हणाला की, सततच्या आरोपांमुळे त्याला खूप वाईट वाटत होते. सूरज म्हणाला की, त्याच्यावरील डाग पुसण्याचा एकमेव मार्ग म्हणजे खटल्याच्या संपूर्ण सुनावणी प्रक्रियेतून जाणे. त्याला याची मोठी किंमत मोजावी लागली असे त्याचे मत आहे; कारण केस चालवणे सोपे नसते, विशेषतः जे मीडियाशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी. सूरज म्हणतो की तो अनेक वर्षे कोर्टात जात असे, कधीकधी आठवड्यातून दोनदा तिथे जात असे आणि कधीकधी सतत सहा दिवस जात असे.
याबरोबरच सूरज पांचोलीने असेही सांगितले की, जिया खानच्या घरी सापडलेल्या पत्रांच्या आधारे त्याला अटक करण्यात आली. पण, नंतर न्यायालयाने ते बनावट घोषित केले. यामुळे जेव्हा त्याला अटक करण्यात आली, तेव्हा प्रश्न पडला की सुरुवातीला त्याला अटक का करण्यात आली? तो आता बोलण्याची आणि ते सांगण्याची हीच योग्य वेळ मानतो, कारण आता लोक त्याचे ऐकण्यास तयार आहेत. त्याने सांगितले की, त्याला अजूनही धक्का बसला आहे की त्याला कोणी फसवले असेल? त्याने असेही संकेत दिले की, त्याचे वडील आदित्य पंचोलीचा द्वेष करणारे लोकदेखील असं करू शकतात. यादरम्यान अभिनेत्याने कोणाचेही नाव घेतले नाही.
सूरज पांचोली त्याच्या पुनरागमनाबद्दल चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो ‘केसरी वीर’ चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत चर्चेत आहे. त्याच्याबरोबर सुनील शेट्टी देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हा चित्रपट २३ मे २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.