Vijay Deverakonda Remarks On Tribal Community : दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा हा त्याच्या अभिनय आणि भूमिकांमुळे कायमच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो. त्याशिवाय तो त्याच्या अनेक वक्तव्यांमुळेही चर्चेत येत असतो. अशाच एका वक्तव्यामुळे अभिनेता अडचणीत सापडला आहे. विजय देवरकोंडाने काही दिवसांपूर्वी आदिवासी समुदायाबद्दल एक अपमानास्पद वक्तव्य केलं होतं, ज्यामुळे वाद निर्माण झाला असून अभिनेत्याविरुद्ध १७ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदिवासी समुदायाचा संदर्भ देणारं वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या एका महिन्यानंतर अभिनेता विजय देवरकोंडावर एससी/एसटी (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएनआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, सैदाबाद येथील रहिवासी आणि आदिवासी समुदायांच्या संयुक्त कृती समितीचे राज्य अध्यक्ष नेनावथ अशोक कुमार नाईक यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

‘रेट्रो’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हैदराबादमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विजय देवरकोंडाला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी काश्मीरमधील पहलगाममधील हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. त्यावेळी विजयनं पाकिस्तानविरुद्ध प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

विजय देवरकोंडा इन्स्टाग्राम पोस्ट

नक्की काय म्हणलेला विजय देवरकोंडा?

यावेळी त्यानं “काश्मीरमध्ये जे काही घडत आहे, त्यावर उपाय म्हणजे त्यांना (दहशतवाद्यांना) शिक्षित करणं. तसेच, त्यांचं ब्रेनवॉश होणार नाही याची खात्री करा. काश्मीर भारताचा आहे आणि काश्मिरी आपले आहेत. ते असे वागत आहेत, जसे आदिवासी कुळे आणि आदिवासी ५०० वर्षांपूर्वी विचार न करता भांडत होते. आजही लोक काहीही समजून न घेता भांडत असतात”, असं म्हटलं होतं.

विजय देवरकोंडाचं हे विधान आदिवासी नेत्यांना आवडलं नाही आणि त्यांनी अभिनेत्यावर आदिवासींची तुलना दहशतवाद्यांशी केल्याचा आरोप केला. या वक्तव्यावरून विजयविरुद्ध अनेक ठिकाणी पोलिसांत तक्रारी करण्यात आल्या आहेत. आता पोलिसांनी आदिवासी समुदायाच्या भावना दुखावल्याबद्दल एससी/एसटी कायद्यांतर्गत विजयविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

आदिवासी संघटनेनं विजयच्या वक्तव्यावर टीका केली आहे आणि त्यानं आदिवासी समुदायाचा अपमान केला असल्याचं म्हटलं आहे. आदिवासी समुदायाला हजारो वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. पर्यावरण संरक्षणात त्यांची विशेष भूमिका आहे. अभिनेत्यानं बोलताना वस्तुस्थिती विचारात घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विजयनं त्याच्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. त्याबद्दल त्यानं एक्सवर पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यानं असं म्हटलं आहे, “माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो. कोणत्याही समुदायाला, विशेषतः आपल्या अनुसूचित जमातींना, ज्यांचा मी खूप आदर करतो आणि आपल्या देशाचा अविभाज्य भाग मानतो, त्यांना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता.”