एके काळी फॅशनच्या प्रसारासाठी रूपेरी पडद्याचे महत्त्व अतोनात होते. मात्र आता काळ बदलला असून छोटय़ा पडदाही त्यात मोठा हातभार लावत आहे. नवनवे फॅशन ट्रेंड्स आणणाऱ्या मालिका गृहिणींच्या गळ्यातील ताईत बनल्या आहेत. ‘बालिका वधू’चा घागरा, साक्षी तन्वरची हेअरस्टाइल, ‘उतरन’ मालिकेतील मीठीचा ब्लाऊज, ‘ना बोले तुम ना मैने कुछ कहा’मधीलल मेघाची हेअर पीन, ‘पम्मी प्यारेलाल’च्या साडय़ा अशा कित्येक गोष्टींना सध्या बाजारात मोठी मागणी आहे. या वस्तू त्या त्या अभिनेत्रींच्या नावानेच ओळखल्या जातात. आनंदीचा घागरा लग्नकार्यासाठी तरुणींकडून हटकून विकत घेतला जातो.तर साक्षी तन्वर साडी आणि हेअरस्टाइल सध्याची ‘हॉट स्टाइल’ झालेली आहे. ‘उतरन’मधील मीठीचा बॅकलेस ब्लाऊजही सध्या ‘इन ट्रेंड’ आहे.
स्टायलिंगच्या या ट्रेंडमध्ये रूपेरी पडद्यापेक्षाही टीव्हीवरील नायिका अधिक भाव खाऊन जात आहेत. त्याकरता चॅनल्सही आता आपले कलाकार इतरांपेक्षा कसे वेगळे आणि उठावदार दिसतील याकडे विशेष लक्ष देत आहेत. सध्या साक्षी तन्वरचा ‘लूक’ कॉर्पोरेट जगतात अधिक आवडू लागला आहे. साक्षी तन्वरच्या ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेतील लुकवर काम करण्यासाठी तब्बल चार स्टायलिस्ट नेमण्यात आल्याचे समजते. एखाद्या कलाकाराचा लूक कसा असावा यावर चॅनेलची ‘क्रिएटिव्ह टीम’ काम करीत आहे. फॅशन जगतातील अनेक बडय़ा नावांचीही याकरता मदत घेतली जात आहे.
एखाद्या मालिकेतील फॅशन लोकांना आपलीशी वाटावी या अनेक गोष्टींचा विचार आम्ही मालिका सुरू होण्याआधीपासूनच करतो, असे ‘कलर्स’चे ‘वीकडे पोग्रॅमिंग हेड’ प्रशांत भट यांनी सांगितले. कलर्सवर सध्या सुरू असलेल्या ‘मिसेस् पम्मी प्यारेलाल’ यातील पम्मीचा लूक कसा असावा आणि तिची फॅशन काय असावी यावर दीड वर्षांपासून काम सुरू होते, अशी माहितीही त्यांनी दिली.
छोटय़ा पडद्यावरील या फॅशनच्या मागणीमुळे येथे अनेक नव्या स्टायलिस्टना संधी मिळू लागली आहे. यासंदर्भात ‘उतरन’साठी स्टायलिस्ट म्हणून काम करणारी सिद्धिका सावंत म्हणाली, माझ्यासाठी ही मालिका म्हणजे एक ‘टर्निग पॉइंट’च होता. या मालिकेच्या माध्यमातून स्टायलिस्ट म्हणून मी या क्षेत्रात सर्वाना माहीत झाले.