Sudesh Mhashilkar Message to Prachi Pisat Screenshot Viral : मराठी टेलिव्हिजनवरील अभिनेत्री प्राची पिसाट हिच्याबरोबर धक्कादायक प्रकार घडला आहे. तिला एका अभिनेत्याने फेसबूक मेसेंजरवर ‘तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झाली आहे, तुझा नंबर पाठव’, अशी मागणी केली आहे. अभिनेत्रीने या चॅटचा स्कीनशॉट फेसबूकवर शेअर करत संताप व्यक्त केला आहे. प्राचीने झी मराठीवरील ‘तू चाल पुढे’ या लोकप्रिय मालिकेत ‘तारा’ ही भूमिका साकारली होती.
प्राचीला मेसेज करून त्रास देणाऱ्या अभिनेत्याचं नाव सुदेश म्हशीलकर असं आहे. सुदेशने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये लहान-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. सुदेशने अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्या ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत खलनायकी भूमिका साकारली होती. यासह त्याने ‘श्रीमंत घरची सून’ व ‘अवघाची संसार’ या मालिकांमध्येही काम केलं आहे. ‘स ला ते स ला ना ते’, ‘जुगाड्या’ व ‘नो प्रॉब्लेम’ या चित्रपटांमध्ये व ‘रानबाजार’ या वेब सिरीजमध्येही काम केलं आहे.

प्राचीने काय म्हटलंय?
सुदेशने म्हशीलकरने प्राची पिसाटला, ‘तुझा नंबर पाठव’, ‘तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीय, कसली गोड दिसतेयस’ असे दोन मेसेज पाठवले आहेत. त्यानंतर प्राचीने सुदेशच्या मेसेजचा स्क्रीनशॉट फेसबूकवर शेअर केला आहे. यासह तिने म्हटलं आहे की “आणि मला हा स्क्रीनशॉट पोस्ट करायची इच्छा झालीय, तुझ्याकडे बायकोचा नंबर असेलच. ती ही गोड आहे. तिच्याशी फ्लर्ट करायला जमतंय का ते बघ. ही पोस्ट डिलीट कर असं सांगायला कुठून तरी माझा नंबर मिळवशील आणि कॉल करशीलच”.
सुदेशने फेसबूकसह इन्स्टाग्रामवरही प्राचीला तोच मेसेज पाठवला आहे. प्राचीने तिला इन्स्टाग्रामवर आलेल्या मेसेजचाही स्क्रीनशॉट शेअर केला आहे.
हे प्रकरण एवढ्यावरच थांबलेलं नाही. प्राचीने काही वेळापूर्वी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिने म्हटलं आहे की “मला धमकावून, प्रेशर टाकून पोस्ट डिलीट करायला व गप्प राहायला सांगितलं. त्यामुळेच मला आता असं वाटतंय की ही पोस्ट माझ्या इन्स्टाग्राम फीडमध्ये असावी. माझी आता तशी इच्छा झाली आहे. चला हा विषय संपवुया… जोपर्यंत सुदेश म्हशीलकर गोड माफी मागत नाही. तोवर ही पोस्ट अशीच राहील. त्याने माझ्या नंबरवर नव्हे तर फेसबूकवर माफी मागावी. माफी मागायची इच्छा नसेल आणि तुम्हाला वेळ असेल तर इतर मुलींनी सांगितलेले तुमचे किस्सेही सांगू शकते”.